David Warner Retirement: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा तडाखेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ३ जानेवारी खेळला जाणारा कसोटी सामना त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना असेल.
पाकिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका ही कारकिर्दीतील शेवटची कसोटी मालिका असेल, असे वॉर्नरने अगोदरच जाहीर केले. मात्र, वॉर्नरने आता एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची माहिती देऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. त्याने असेही म्हटले आहे की, तो पुढील दोन वर्ष टी-२० क्रिकेट खेळताना पूर्णपणे तंदुरुस्त राहिला आणि २०२५ मध्ये खेळल्या जाणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये संघाला त्याची गरज असेल तो निश्चितपणे एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल.
'मी निश्चितपणे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. विश्वचषकादरम्यानच एकदिवसीय क्रिकेटला अलविदा करण्याचा मी विचार केला होता. एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे, असे मला वाटते. या निर्णयानंतर मला जगभरातील टी-२० लीगमध्ये खेळण्याची संधी मिळेल. मला माहिती आहे की, चॅम्पियन्स ट्रॉफी जवळ आली आहे. येत्या दोन वर्षांत जर मी चांगले क्रिकेट खेळत राहिलो आणि ऑस्ट्रेलियाला संघाला माझी गरज असेल तर मी नक्कीच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल.
डेव्हिड वॉर्नरने १६१ एकदिवसीय आणि १११ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. डेव्हिड वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४५.३० सरासरीने आणि ९७.२६ स्ट्राईक रेटने ६ हजार ९३२ धावा केल्या. ज्यात २२ शतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ४४.५८ च्या सरासरीने ८ हजार ६९५ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये डेव्हिड वॉर्नरने २६ शतक झळकावली आहेत. डेव्हिड वॉर्नर दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाचा भागही होता.