
Australia Vs Pakistan 1st Test : पाकिस्तानचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. उभय संघांमधील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने शतक ठोकले आहे. वॉर्नरचे कसोटी करिअरचे २६ वे शतक आहे. वॉर्नर सध्या १३७ चेंडूत १०४ धावांवर खेळत आहे.
हे वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २ बाद २०० धावा केल्या आहेत. वॉर्नरसोबत स्टीव्ह स्मिथ १८ धावांवर खेळत आहे.
दरम्यान, शतक झळकावून वॉर्नरने या मालिकेसाठी संघात त्याच्या निवडीला विरोध करणाऱ्या मिचेल जॉन्सनला प्रत्युत्तर दिले आहे. वॉर्नरची ही शेवटची कसोटी मालिका आहे. अशा स्थितीत जॉन्सन त्याला निरोपाची मालिका खेळू देण्याच्या विरोधात होता. वॉर्नरचे कसोटी कारकिर्दीतील हे २६ वे शतक आहे.
तत्पूर्ली, या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर वॉर्नरने उस्मान ख्वाजाच्या साथीने लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाला एकही विकेट गमावू दिली नाही. दोघांनी पाकिस्तानी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी झाली.
ख्वाजाने ९८ चेंडूत ४१ धावांची खेळी खेळली. त्याला शाहीन आफ्रिदीने यष्टिरक्षक सर्फराज अहमदच्या हाती झेलबाद केले. त्याचवेळी दुसरी विकेट मार्नस लॅबुशेनच्या रूपाने पडली. तो २५ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. फहीम अश्रफला लॅबुशेनची पायचीत विकेट मिळाली.
उभय संघांमधील २०२२ मध्ये शेवटचा कसोटी सामना पाकिस्तानमध्ये झाला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांची मालिका १-० ने जिंकली होती. ऑस्ट्रेलिया या मालिकेत जागतिक कसोटी चॅम्पियन म्हणून आणि पूर्णपणे मजबूत संघासह उतरला आहे. मिचेल मार्शची कॅमेरून ग्रीनच्या जागी अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली असून नॅथन लायन दुखापतीतून पुनरागमन करत आहे.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिच मार्श, अॅलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड.
पाकिस्तान : इमाम उल हक, अब्दुल्ला शफीक, शान मसूद (कर्णधार), बाबर आझम, सौद शकील, सरफराज खान, सलमान अली आगा, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, आमिर जमाल, खुर्रम शहजाद.
संबंधित बातम्या
