मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  David Warner : डेव्हिड वॉर्नरसारखं जगात कुणीच नाही, १००व्या टी-20 सामन्यात पठ्ठ्यानं केला अनोखा विक्रम

David Warner : डेव्हिड वॉर्नरसारखं जगात कुणीच नाही, १००व्या टी-20 सामन्यात पठ्ठ्यानं केला अनोखा विक्रम

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Feb 09, 2024 09:52 PM IST

David Warner 100 th T20 Match : डेव्हिड वॉर्नर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधील १००व्या सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. यासह तो तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा जगातील तिसरा खेळाडू ठरला आहे.

David Warner 100 th T20 Match
David Warner 100 th T20 Match (PTI)

AUS vs WI, David Warner : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात आज शुक्रवारी (९ फेब्रुवारी) अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने एक मोठी कामगिरी केली. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा डेव्हिड वॉर्नर हा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे.

वॉर्नर आधी भारताचा विराट कोहली आणि न्यूझीलंडचा रॉस टेलर हे जगातील इतर दोन खेळाडू आहेत, ज्यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 

न्यूझीलंडच्या रॉस टेलरने ११२ कसोटी, २३६ एकदिवसीय आणि १०२ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर विराट कोहलीने आतापर्यंत ११३ कसोटी, २९२ एकदिवसीय आणि ११७ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

दरम्यान, डेव्हिड वॉर्नर आता फक्त T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये सक्रिय आहे. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध आज कारकिर्दीतील १०० वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 

त्याने १६१ एकदिवसीय आणि ११२ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २७ वर्षीय वॉर्नर यंदाच्या T20 विश्वचषकानंतर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही अलविदा करणार आहे. त्याने याआधीच वनडे आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

वॉर्नरने खेळली तुफानी खेळी 

डेव्हिड वॉर्नरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तुफानी खेळी केली. वॉर्नरने अवघ्या ३६ चेंडूंत १२ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ७० धावा केल्या. वॉर्नरने सलामीवीर जोश इंग्लिस (३९) सोबत पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. वॉर्नरच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ७ गडी गमावून २१३ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने २० षटकात ८ बाद २०२ धावा केल्या आणि टी-20 सामना ११ धावांनी गमावला.

वॉर्नर अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

डेव्हिड वॉर्नरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्धशतक झळकावून इतिहास रचला. वॉर्नर आपल्या १००व्या कसोटी, १००व्या वनडे आणि १००व्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

WhatsApp channel