David Warner : ऑस्ट्रेलियाचा सुपरस्टार डेव्हिड वॉर्नर त्याच्या करिअरचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेेळत आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सिडनी येथे कसोटी सामना खेळला जात आहे. हाच वॉर्नरच्या करिअरचा शेवटचा सामना आहे. यानंतर डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या जर्सीमध्ये खेळताना कधीही दिसणार नाही.
दरम्यान, हा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी वॉर्नरची बॅगी ग्रीन कॅप गायब झाली होती, ही माहिती वॉर्नरनेच व्हिडीओ पोस्ट करून दिली होती. व्हिडीओत वॉर्नर म्हणाला होता की, ‘जर कोणाकडे ती असेल किंवा कोणाला ती सापडली तर त्यांनी आपली बॅगी ग्रीन परत करावी’.
यानंतर आता सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी वॉर्नरला त्याची बॅगी ग्रीन कॅप परत मिळाली आहे. वॉर्नरेच ही गुड न्यूज चाहत्यांसोबत व्हिडीओ शेअर करून दिली आहे.
ही कॅप मिळाल्यानंतर वॉर्नरने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याच्या सर्व चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. व्हिडीओत त्याने म्हटले की, मला तुम्हा सर्वांना सांगताना खूप आनंद होत आहे की मला माझी बॅगी ग्रीन कॅप परत मिळाली आहे. ही खूप चांगली बातमी आहे. ही टोपी शोधण्यात सहभागी असलेल्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो'.
विशेष म्हणजे, त्याच्या करिअरच्या शेवटच्या कसोटीपूर्वी ही बॅगी ग्रीन कॅप गायब झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर चांगलाच नाराज झाला होता. या बॅगी ग्रीनला खूप महत्व आहे. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी फॉर्मेटमध्ये खेळणारे खेळाडू ही कॅप घालूनच मैदानात उतरतात. लोकरीपासून बनवलेली ही टोपी हिरव्या रंगाची असते, यावर एक अंक लिहिलेला असतो, हा अंक तो खेळाडू आपल्या देशासाठी कसोटी खेळणारा कितवा खेळाडू आहे, हे समजते. १९०० पासून ऑस्ट्रेलियन खेळाडू ही कॅप परिधान करून कसोटी क्रिकेट खेळत आहेत.
पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मालिका आहे. यासह यावर्षाच्या सुरुवातीला वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीही जाहीर केली. अशाप्रकारे २०२३ च्या विश्वचषकातील अंतिम सामना हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा वनडे सामना ठरला.
मात्र, वॉर्नरने २०२५ मध्ये एकदिवसीय फॉर्मेटमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपण उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. यासोबतच तो जगभरातील फ्रँचायझी टूर्नामेंटमध्ये टी-20 क्रिकेट खेळताना दिसणार आहे.