David Miller retirement rumours: टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारतीय संघाचा विजय आणि विराट कोहली- रोहित शर्माची निवृत्तीसह सूर्यकुमार यादवची झेल भारतीयांसाठी अविस्मरणीय ठरला. अत्यंत मोक्याची क्षणी सूर्यकुमार यादवने हा झेल घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या संघाला बॅकफूटवर ढकलले. दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मिलरने सूर्यकुमार यादवने घेतलेल्या झेलचा धसका घेतला असून टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, अशा बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर स्वत: डेव्हिड मिलरने स्पष्टीकरण दिले आहे.
डेव्हिड मिलरने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत त्याच्या आंतरराष्ट्रीय टी- २० क्रिकेटमधून निवृत्तीबद्दलच्या बातम्या निराधार आहेत. या सर्व अफवा आहेत. मिलरने एका छोट्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तो मैदानावर आपली प्रतिभा दाखवत राहील आणि त्याचे सर्वोत्तम येणे बाकी आहे. याचा अर्थ असा होतो की, तो यापुढेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्त्व करताना दिसणार आहे. यामुळे सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या बातम्या खोट्या असल्याचे स्पष्ट झाले.
डेव्हिड मिलर म्हणाला की, मी अजूनही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली नाही. मी यापुढेही दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० संघाचा भाग असेल. पुढे डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, अजून माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम येणे बाकी आहे.
टी-२० विश्वचषकानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा यांनी २९ जून २०२४ रोजी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. भारताच्या विजयानंतर विराट कोहलीने निवृत्तीची घोषणा केली. काही वेळातच रोहित शर्मानेही निवृत्ती जाहीर केली. यानंतर दुसऱ्या दिवशी रवींद्र जाडेजाने टी-२० क्रिकेटला अलविदा केला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमारने डेव्हिड मिलरची झेल पकडून भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. मिलरने १७ चेंडूत २१ धावा केल्या. महत्त्वाचे म्हणजे, जगातील स्फोटक फलंदाजांच्या यादीत मिलरची गणना केली जाते. या सामन्यात मिलर शेवटपर्यंत राहिला असता तर कदाचित सामन्याचा निकाल दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला असता, अशी शक्यता नाकारता येत नाही.