टीम इंडियाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन, भारतीय क्रिकेटवर शोककळा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  टीम इंडियाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन, भारतीय क्रिकेटवर शोककळा

टीम इंडियाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन, भारतीय क्रिकेटवर शोककळा

Feb 13, 2024 01:44 PM IST

Dattajirao Gaekwad Passes Away : भारताचे ज्येष्ठ क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन झाले आहे. दत्ताजीरावांनी काही सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्वही केले.

Dattajirao Gaekwad Passes Away
Dattajirao Gaekwad Passes Away

Dattajirao Gaekwad Passes Away : भारतीय क्रिकेटमधून एक वाईट बातमी आली आहे. भारताचे माजी कर्णधार आणि देशातील सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू दत्ताजीराव गायकवाड यांचे आज मंगळवारी (१३ फेब्रुवारी) निधन झाले आहे. दत्ताजीराव गायकवाड यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

गायकवाड यांच्या निधनामुळे क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. बीसीसीआयसह दिग्गज क्रिकेटपटूंनी दत्ताजीराव गायकवाड यांना श्रद्धांजली वाहिली.

दत्ताजीराव गायकवाड भारताचे कसोटीपटू होते. १९५२ ते १९६१ दरम्यान ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले. या कालावधीत, त्यांनी भारतासाठी एकूण ११ कसोटी सामने खेळले. २० डावात गायकवाड यांनी १८.४२ च्या सरासरीने ३५० धावा केल्या. यात त्यांनी १ अर्धशतक झळकावले.

बडोद्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेट

या सोबतच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दत्ताजीराव गायकवाड यांनी बडोद्याचे प्रतिनिधित्व केले. गायकवाड यांनी बडोद्यासाठी ११० प्रथम श्रेणी सामने खेळले. या सामन्यांच्या १७२ डावांमध्ये फलंदाजी करताना त्यांनी ३६.४० च्या सरासरीने ५७८८ धावा केल्या. या कालावधीत, त्यांनी १७ शतके आणि २३ अर्धशतके केली. यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या नाबाद २४९ धावा होती. दत्ताजीराव गायकवाड यांनी प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २५ बळीदेखील घेतले.

दत्ताजीराव हे अंशुमन गायकवाड यांचे वडील

दत्ताजीराव गायकवाड यांचा मुलगा अंशुमन गायकवाड हे देखील भारताकडून क्रिकेट खेळले आहेत. अंशुमन गायकवाड यांनी १९७४ ते १९८७ दरम्यान टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. अंशुमन यांनी ४० कसोटी आणि १५ एकदिवसीय सामने खेळले.

अंशुमन गायकवाड भारताचे टॉप ऑर्डरचे फलंदाज होते. ४० कसोटींच्या ७० डावांत फलंदाजी करताना त्यांनी ३०.०७ च्या सरासरीने १९८५ धावा केल्या. यादरम्यान, त्यांनी २ शतके आणि १० अर्धशतके केली. यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या २०१ धावा होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या