क्रिकेट वर्ल्डकप २०२३ चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला आणि फायनलमध्ये एन्ट्री केली.
सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ३९७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड ४८.५ षटकात ३२७ धावांवर सर्वबाद झाला.
रोहित सेनेने विल्यमसन आणि कंपनीचा पराभव केला, पण हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाच्या गोलंदाजांना प्रचंड मेहनत घ्यावी लागली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जबरदस्त झुंज दिली.
विशेषत: अनुभवी किवी फलंदाज डॅरेल मिचेलने शेवटपर्यंत झुंज दिली. प्रतिस्पर्धी असूनही भारतीय चाहते मिशेलचे कौतुक करत आहेत. या खेळीदरम्यान डॅरेल मिशेलने एक गगनचुंबी षटकारही मारला, हा षटकार या वर्ल्डकपचा सर्वात लांब षटकार ठरला आहे.
अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेट संघासाठी न्यूझीलंडच्या डावातील २७ वे षटक टाकत होता. जडेजाच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर मिशेल स्ट्राइकवर होता. जडेजाने मिशेलच्या पट्ट्यात चेंडू टाकला, या चेंडूवर मिशेलने लाँग ऑनवर मॉन्स्टर सिक्स मारला. मिशेलचा हा षटकार १०७ मीटर लांब गेला. या विश्वचषकातील हा सर्वात मोठा षटकार होता. आयसीसीनेच या षटकाराचा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि न्यूझीलंड धर्मशाला येथे आमनेसामने आले होते, तेव्हा त्या सामन्यातही डॅरेल मिशेलने शतक झळकावले होते. आता उपांत्य फेरीतही त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली. मिचेलने ११९ चेंडूत १३४ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत त्याने ११२ च्या स्ट्राईक रेटने ९ चौकार आणि ७ षटकार मारले. मात्र, मिशेलची ही खेळी न्यूझीलंडला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली नाही.