IND vs ENG : कटकच्या ग्राऊंड स्टाफची अफलातून शक्कल, उष्णतेनं त्रासलेल्या चाहत्यांवर पाण्याचा फवारा, पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG : कटकच्या ग्राऊंड स्टाफची अफलातून शक्कल, उष्णतेनं त्रासलेल्या चाहत्यांवर पाण्याचा फवारा, पाहा

IND vs ENG : कटकच्या ग्राऊंड स्टाफची अफलातून शक्कल, उष्णतेनं त्रासलेल्या चाहत्यांवर पाण्याचा फवारा, पाहा

Updated Feb 09, 2025 05:55 PM IST

India Vs England 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना कटक येथे खेळवला जात आहे. पण सामना पाहायला गेलेल्या चाहत्यांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागला.

IND vs ENG : कटकच्या ग्राऊंड स्टाफची अफलातून शक्कल, उष्णतेनं त्रासलेल्या चाहत्यांवर पाण्याचा फवारा, पाहा
IND vs ENG : कटकच्या ग्राऊंड स्टाफची अफलातून शक्कल, उष्णतेनं त्रासलेल्या चाहत्यांवर पाण्याचा फवारा, पाहा

भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना (९ फेब्रुवारी) कटक येथील बाराबती स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या सामन्यातही त्याने फलंदाजी निवडली होती.

पण त्यांना त्या सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले. भारताने ११ षटके शिल्लक असताना तो सामना जिंकला.

कटकमध्ये प्रचंड उष्णता

दरम्यान, ओडिशातील कटक शहरात खूप उष्णता आहे. उत्तर भारतात अजूनही खूप थंडी आहे पण समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या कटकमध्ये तशी परिस्थिती नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचलेल्या चाहत्यांनाही उन्हाचा तडाखा सहन करावा लागला.

चाहत्यांवर पाण्याचा फवारा

पण अशा स्थितीत कटकच्या ग्राउंड स्टाफने चाहत्यांना उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी एक अद्भुत मार्ग शोधला. इंग्लंडच्या पहिल्या डावात चाहत्यांवर पाण्याचे फवारे मारण्यात आले. त्यामुळे सर्वांना उन्हापासून थोडासा दिलासा मिळाला.

अश्विननं शेअर केली स्टोरी

भारतीय संघाचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यालाही ही पद्धत खूप आवडली. त्याने या प्रसंगाचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यासोबतच अश्विनने लिहिले की, कटकमध्ये चाहत्यांवर पाण्याचा वर्षाव करण्यात आला. यासोबतच त्याने हसणारे इमोजीही जोडले आहेत.

वरुण चक्रवर्तीचे वनडे पदार्पण

मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती या सामन्यातून भारतासाठी पदार्पण केले आहे. कुलदीप यादवला विश्रांती देऊन वरुणचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला. चक्रवर्तीने या सामन्यात १० षटकात ५४ धावा देत १ विकेट घेतला. यशस्वी जैस्वालच्या जागी विराट कोहलीला संघात प्रवेश मिळाला.

२०१९ नंतर कटकमध्ये वनडे सामना

२०१९ नंतर कटकमध्ये एकही एकदिवसीय सामना खेळवला गेला नाही. २०१९ मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज येथे भिडले होते. २०२२ मध्ये या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 सामना झाला होता. यानंतर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे सामना खेळला जात आहे.

इंग्लंडच्या ३०४ धावा

या सामन्यात इंग्लंडने भारताला ३०५ धावांचे लक्ष्य दिले आहे. बेन डकेट आणि जो रूट यांनी संघासाठी चमकदार कामगिरी केली. या दोघांनी अर्धशतके झळकावली. डकेट ६५ धावा करून बाद झाला. रुट ६९ धावा करून बाद झाला. जोस बटलरने ३४ धावांचे योगदान दिले. अशा प्रकारे संपूर्ण संघ ५०व्या षटकात ३०४ धावा करून ऑलआऊट झाला.

रवींद्र जडेजाने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने १० षटकात ३५ धावा देत ३ बळी घेतले. यानंतर वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, हर्षित राणा आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या