मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CSK Vs KKR : कोलकाताचा पहिला पराभव, धोनीच्या सीएसकेनं ७ विकेट्सनी उडवला धुव्वा, ऋतुराजचं अर्धशतक

CSK Vs KKR : कोलकाताचा पहिला पराभव, धोनीच्या सीएसकेनं ७ विकेट्सनी उडवला धुव्वा, ऋतुराजचं अर्धशतक

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 08, 2024 11:07 PM IST

CSK Vs KKR IPL Live Score : आयपीएल २०२४ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने आहेत. या सामन्याचा लाईव्ह स्कोअर येथे पाहू शकता.

Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Highlights
Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Highlights (PTI)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज (८ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना खेळला गेला. आयपीएलचा हा २२वा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झाला. या सामन्यात सीएसकेने ७ विकेट्सनी विजय मिळवला.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जकडून आधी रवींद्र जडेजा आणि तुषार देशपांडे यांच्या शानदार गोलंदाजी केली. त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५८ चेंडूत ९ चौकारांच्या मदतीने ६७ धावांची नाबाद खेळी केली. या जोरावर सीएसकेने कोलकाता नाईट रायडर्सचा ७ गडी राखून पराभव केला. सलग दोन सामने गमावल्यानंतर, चेन्नई आपल्या घरच्या मैदानावर विजयी ट्रॅकवर परतली आहे, तर केकेआरला या हंगामात पहिला पराभव स्वीकारावा लागला.

तत्पूर्वी, या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना केवळ १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने १७.४ षटकांत केवळ ३ विकेट्स गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला. 

गायकवाडने ५८ चेंडूत नाबाद ६७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. तर शिवम दुबेने १८ चेंडूत २८ धावा केल्या. चेन्नईचा या मोसमातील हा तिसरा विजय आहे, तर केकेआरचा पहिला पराभव आहे.

 

सीएसके वि. केकेआर क्रिकेट स्कोअर

डेरिल मिशेल बाद

केकेआरचा फिरकीपटू सुनील नरेनने डेरिल मिशेलला बाद करून सीएसकेला दुसरा धक्का दिला. मिचेल १९ चेंडूत २५ धावा करून बाद झाला. तथापि, CSK कर्णधार रुतुराज गायकवाड ४८ चेंडूत ५२ धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित असून शिवम दुबे नवा फलंदाज म्हणून क्रीजवर आला आहे.

गायकवाड-मिशेलची शानदार फलंदाजी

रचिन रवींद्रच्या रूपाने पहिला धक्का बसल्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल यांनी सीएसकेला सावरले आहे. दोन्ही फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत ९ षटकात ७४ धावा केल्या आहेत. ऋतुराज ३३ चेंडूत ३७ धावा आणि डॅरिल मिशेल १३ चेंडूत २० धावांवर खेळत आहे.

रचिन रवींद्र बाद

केकेआरचा गोलंदाज वैभव अरोरा याने सीएसकेचा सलामीवीर रचिन रवींद्रला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. ८ चेंडूत १५ धावा करून रचिन बाद झाला. आता कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि डॅरिल मिशेल क्रीझवर आहेत.

केकेआरच्या १३७ धावा

फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे यांच्या प्रत्येकी ३ बळींच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत ९ गडी गमावून १३७ धावांवर रोखले. 

केकेआरसाठी कर्णधार श्रेयस अय्यरने ३२ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३४ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. याशिवाय सुनील नरेनने २० चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या, त्याने अंगक्रिश रघुवंशीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली.

रघुवंशीने १८ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २४ धावांचे योगदान दिले. केकेआरसाठी नरेन आणि रघुवंशी यांच्यात केवळ अर्धशतकी भागीदारी झाली आणि ही भागीदारी तुटल्यानंतर केकेआरच्या डावाला गळती लागली. ते शेवटपर्यंत सावरू शकले नाही.

रमणदीप सिंग बाद

रमणदीपच्या रूपाने केकेआर संघाने पाचवी विकेटही गमावली आहे. सीएसकेच्या महीश थीक्षानाने रमणदीपला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रमणदीप १२ चेंडूत १३ धावा करून बाद झाला. आता रिंकू सिंग क्रीझवर आला असून कर्णधार श्रेयस अय्यर त्याच्यासोबत आहे.

जडेजाला मिळाली तिसरी विकेट

रवींद्र जडेजाने केकेआरच्या डावाला गळती लावली आहे. जडेजाने व्यंकटेश अय्यरला झेलबाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. व्यंकटेश ८ चेंडूत ३ धावा करून बाद झाला. केकेआरने अवघ्या ६४ धावांवर ४ विकेट गमावल्या आहेत. या सामन्यातील जडेजाची ही तिसरी विकेट आहे.

फिल सॉल्ट पहिल्याच चेंडूवर बाद

कोलकाता नाईट रायडर्सला पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टच्या रूपाने धक्का बसला. केकेआरच्या ृसॉल्टला तुषार देशपांडेने शुन्यावर बाद केले. केकेआरसाठी सुनील नरेनसह आंगकृष्ण रघुवंशी क्रीजवर उपस्थित आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती 

चेन्नई सुपर किंग्स (प्लेइंग इलेव्हन) : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, महेश थीक्षाना.

सीएसकेने टॉस जिंकला

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसकेचा कर्णधार गायकवाड म्हणाला की, वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना या सामन्यासाठी उपलब्ध नाही, यामुळे मुस्तफिझूर रहमान हा सामना खेळणार आहे.

सोबतच शार्दुल ठाकूर आणि समीर रिझवी यांचेही संघात पुनरागमन झाले आहे. तरकेकेआरने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

सीएसके विजयी मार्गावर येण्याचा प्रयत्न करणार

यंदाच्या आयपीेलमध्ये दोन्ही संघांनी धमाकेदार सुरुवात केली होती. पण चेन्नई सुपर किंग्सने मागील सलग दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे ते आजच्या सामन्यातून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करतील.

यासोबतच कोलकाता नाईट रायडर्स या मोसमात तुफानी फॉर्मात दिसत आहे. त्यांनी सलग तीन सामन्यांत विजय मिळवून गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले आहे.

सीएसके वि. केकेआर हेड टू हेड

आयपीएलच्या १७व्या मोसमात चेन्नई आणि कोलकाता आज पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळू शकते. आयपीएलमध्ये (CSK vs KKR Head To Head Record) कोलकाताविरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आयपीएलमध्ये आतापर्यंत २९ सामने झाले आहेत. यापैकी चेन्नईने १८ सामने जिंकले आहेत तर कोलकाताने १० सामने जिंकले आहेत. त्याचवेळी एक सामना अनिर्णित राहिला आहे.

चेपॉकची खेळपट्टी कशी असेल?

चेपॉकच्या मैदानावर गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये जबरदस्त स्पर्धा होऊ शकते. येथे नेहमीच फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व राहिले आहे. पण संध्याकाळनंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होते.

तर दुसरीकडे, नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांनाही खूप मदत मिळते. मात्र, या मोसमात आतापर्यंत या मैदानावर २ सामने खेळले गेले आहेत. जिथे खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल दिसत आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायला आवडेल.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्स- ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डॅरेल मिशेल, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना.

कोलकाता नाईट रायडर्स- फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

IPL_Entry_Point