Ruturaj Gaikwad Replacement : चेन्नई सुपर किंग्जने ऋतुराज गायकवाड याच्या जागी आयुष म्हात्रे याचा संघात समावेश केला आहे. कोपराच्या फ्रॅक्चरमुळे कर्णधार गायकवाड संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे, त्यानंतर आता एमएस धोनी संघाचे नेतृत्व करत आहे. सीएसके ज्या खेळाडूंचा विचार करत होते त्यामध्ये पृथ्वी शॉचाही समावेश होता.
काही दिवसांपूर्वी संघाने काही तरुण खेळाडूंच्या चाचण्या घेतल्या, त्यानंतर संघाने मुंबईचा तरुण सलामीवीर फलंदाज म्हात्रे याला संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला.
पाच वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी हा निर्णय घेतला. तो (आयुष म्हात्रे) अद्याप संघाशी संबंधित नाही, पण तो येत्या काही दिवसांत सीएसके संघात सामील होऊ शकतो. फ्रँचायझीने त्याला ताबडतोब सामील होण्यास सांगितले आहे. आयपीएल लिलावात म्हात्रेची मूळ किंमत ३० लाख रुपये होती, परंतु तो विकला गेला नाही.
"तो काही दिवसांत मुंबईत संघात सामील होईल," असे सीएसके व्यवस्थापनाच्या जवळच्या सूत्रांनी क्रिकबझला सांगितले. चेन्नई सुपर किंग्ज सध्या त्यांच्या ७ व्या सामन्यासाठी लखनौमध्ये आहेत. त्यांचा आज सोमवारी भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर लखनौशी सामना होणार आहे.
सध्या चेन्नई सुपर किंग्जची परिस्थिती वाईट आहे. संघाच्या खात्यात एक विजय आणि २ गुण आहेत. पहिला सामना जिंकल्यानंतर, संघाने सलग ५ सामने गमावले आहेत.
चेन्नई सुपर किंग्जने काही दिवसांपूर्वी आयुष म्हात्रे, गुजरातचा उर्विल पटेल आणि केरळचा सलमान निजार यांना ट्रायल्ससाठी चेन्नईला बोलावले होते. आयपीएल लिलावात अनसोल्ड ठरलेला पृथ्वी शॉ देखील या शर्यतीत होता, परंतु संघाने ऋतुराज गायकवाडच्या जागी आयुषची निवड केली.
आयुष म्हात्रे याने ९ प्रथम श्रेणी सामन्यांमधील १६ डावांमध्ये ५०४ धावा केल्या आहेत, त्याची सर्वोच्च धावसंख्या १७६ धावा आहे. त्याने यामध्ये २ शतके आणि १ अर्धशतक झळकावले आहे. लिस्ट ए मध्ये त्याने ७ डावात ४५८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याने २ शतके आणि १ अर्धशतक झळकावले आहे.
संबंधित बातम्या