IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) चेन्नई सुपर किंग्जने विक्रमी पाच विजेतेपदे पटकावण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल न करणे. शेन वॉटसन त्यापैकी एक उदाहरण आहे. आयपीएल २०१९ मध्ये शेट वॉटसन पूर्णपणे प्लॉप ठरला. मात्र, अखेरच्या काही सामन्यात त्याने महत्त्वाची खेळी करत विश्वास संपादन केला. या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने तिसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले. या हंगामातील अंतिम सामन्यात शेन वॉटसनने ५९ चेंडूत ८० धावांची खेळी केली.
क्रिकबझशी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, "चेन्नई सुपरकिंग्जने घाईगडबडीत निर्णय घेतले आहेत. ज्यात अजिंक्य रहाणेला सलामीला पाठवणेआणि कर्णधार गायकवाडला खाली उतरविणे यांचा समावेश आहे. सीएसके आपल्या रणनीतीबद्दल संभ्रमात दिसला आहे. चेन्नईचा संघ नेहमीच चांगली कामगिरी करतो. परंतु, त्यांच्या संघात सातत्याने बदल करताना मी पहिल्यांदाच पाहिले आहे. गायकवाडऐवजी रहाणे सलामीला येऊ लागला. त्यानंतर आता रचिन रवींद्रला विश्रांती देण्यात आली आहे. असे नाही की रचिनने आतापर्यंत खराब फलंदाजी केली, त्याने दोन सामन्यात चांगली फलंदाजी केली आहे. सहसा चेन्नईच्या संघात बदल केला जात नाही. आधी त्यांनी डॅरिल मिशेल आणि आता रचिनला बाहेर बसवले. पुढच्या सामन्यात आणखी कोणाला बसवू शकतात. हे धोरणात्मक बदल नाहीत. गेल्या काही सामन्यांमध्ये हे बदल करण्यात सीएसकेथोडी घाई करत असल्याचे मला वाटते."
चेन्नई सुपरकिंग्जने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सात सामन्यांपैकी चार सामने जिंकले आहेत. आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत चेन्नईचा संघ चौथ्या स्थानावर आहे. आज चेन्नई सुपरकिंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलमधील ३९ वा सामना खेळला जात आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे.
अजिंक्य रहाणे, रचिन रवींद्र, रुतुराज गायकवाड (कर्णधार), रवींद्र जडेजा, शिवम दुबे, समीर रिझवी, मोईन अली, एमएस धोनी (विकेटकिपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, शार्दुल ठाकूर, शेख रशीद, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, डॅरिल मिशेल, अरावेली अवनीश, महेश टेकशाना, आरएस हंगरगेकर, सिमरजीत सिंह, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी, अजय जाधव मंडल, रिचर्ड ग्लीसन.