RR VS CSK IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या ११ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा ६ धावांनी पराभव केला. रविवारी (३० मार्च) गुवाहटीच्या बारसपारा स्टेडियमवर हा सामना खेळला गेला.
या सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सीएसकेला २० षटकात ६ बाद १७६ धावाच करता आल्या.
तत्पूर्वी, १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग CSK संकटात सापडला होता, अशा वेळी फिनीशर धोनी फलंदाजीला आला. धोनी मैदानात आला, तेव्हा टीमला विजयासाठी २५ चेंडूत ५४ धावा करायच्या होत्या. 'थाला' सहसा असे सामने पूर्ण केल्यानंतरच श्वास घेतो, परंतु राजस्थानविरुद्धच्या सामन्यात तो ११ चेंडूत १६ धावा करून बाद झाला.
संदीप शर्मा याच्या गोलंदाजीवर शिमरॉन हेटमायर याने धोनीचा अप्रतिम झेल घेतला. हा सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला, मात्र या मैदानावर धोनीला सपोर्ट करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. धोनी बाद झाल्यानंतर एका महिला फॅनची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.
चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या षटकात विजयासाठी २० धावांची गरज होती. तर संदीप शर्मा गोलंदाजीला होता. संदीपने पहिला चेंडू वाईड टाकला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर धोनीने मोठा फटका खेळला. पण चेंडू सीमापार जाऊ शकला नाही. फिल्डर शिमरॉन हेटमायर याने एमएस धोनीचा अवघड झेल पूर्ण केला. हा झेल घेताच एका मुलीने खतरनाक रिअॅक्शन दिली. ही मुलगी काहीच बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर संतापाचे भाव स्पष्टपणे दिसत होते.
ही मुलगी चांगलीच व्हायरल झाली असून सोशल मीडियावर तिच्यावरून बरेच मीम्स शेअर केले जात आहेत.
चेन्नई सुपर किंग्जला IPL २०२५ मध्ये सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. CSK ने त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा ४ विकेटने पराभव केला होता, परंतु त्यानंतर RCB आणि राजस्थान रॉयल्स चेन्नईला हरवण्यात यशस्वी ठरले. सध्या चेन्नईचा संघ गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर आहे.
एमएस धोनीची बॅटिंग ऑर्डरही चर्चेचा विषय आहे. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता, पण संघाला विजयापर्यंत नेण्यात तो अपयशी ठरला. आता राजस्थानविरुद्धच्या सामन्यात त्याने ७व्या स्थानावर फलंदाजी केली, पण केवळ १६ धावा करून तो बाद झाला.
संबंधित बातम्या