आयपीएल २०२५ साठी मेगा लिलावाची चर्चा सुरू झाली आहे. पण याआधी संघ मालकांची एक बैठक पार पडली. या बैठकीत संघ मालकांमध्ये काही विषयांवरून मतभेद असल्याचे समोर आले आहे.
यापैकीच एक विषय महेंद्रसिंह धोनीशी संबंधित आहे. वास्तविक, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या व्यवस्थापनाने मेगा लिलावापूर्वी BCCI कडे एक मागणी केली. आहे. मेगा ऑक्शनमध्ये एमएस धोनीचा अनकॅप्ड खेळाडू म्हणून विचार करण्याची विनंती सीएसकेने बीसीसीआयला केली आहे.
CSK ला हा जुना नियम पुन्हा लागू करायचा आहे असे एका मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे. या नियमानुसार, जर एखाद्या खेळाडूने निवृत्त होऊन ५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल, तर तो अनकॅप्ड खेळाडू मानला जाईल.
२०२२ च्या लिलावापूर्वी इंडियन प्रीमियर लीग समितीने या नियमावर बंदी घातली होती. तर धोनीने २०१९ नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी एकही सामना खेळला नव्हता, १५ ऑगस्ट २०२० रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला.
३१ जुलै रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत CSK ने धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून घोषित करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता, परंतु SRH मालक काव्या मारन यांसह अनेक संघांचे मालक या निर्णयाच्या विरोधात आहेत.
सनरायझर्स हैदराबादच्या मालक काव्या मारन यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत सांगितले की, जर एखाद्या निवृत्त खेळाडूला अनकॅप्ड या टॅगसह लिलावात आणले तर ते त्याच्या महानतेच्या विरोधात असेल. काव्याच्या मते, जर लिलावात अनकॅप्ड खेळाडू आला आणि तो रिटेन केलेल्या अनकॅप्ड खेळाडूपेक्षा जास्त पैसे घेत असेल तर तो धोनीसारख्या दिग्गजांचा अपमान होईल. धोनीने लिलावात उतरावे, जेणेकरून त्याला लिलावात योग्य किंमत मिळू शकेल, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
सोबतच बीसीसीआय आणि आयपीएल संघ मालकांच्या बैठकीत आणखी एक मुद्दा उपस्थित करण्यात आला. तो म्हणजे, खेळाडू निवृत्त होऊन ५ वर्षे किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल, तर त्याची बेस प्राइस कमी करण्यात यावी.
रिपोर्ट्सनुसार, ही सूचना आयपीएलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर हेमांग अमीन यांनी दिली आहे. अशा खेळाडूंची बेस प्राइस कमी केल्यास लिलावात त्यांना खरेदी करण्याची शक्यता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संबंधित बातम्या