IPL 2024: आयपीएल २०२४ च्या सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा ६३ धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत सहा विकेट्स गमावून २०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाला निर्धारित २० षटकांत १४३ धावांपर्यंत मजल मारता आली.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई संघाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रुतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र यांनी संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनी ३२ चेंडूत ६२ धावांची भागीदारी केली. यात रचिनच्या २० चेंडूत ४६ धावा आहेत. यादरम्यान रचिनने सहा चौकार आणि तीन षटकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट २३० होता. अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. तो १२ चेंडूत १२ धावा करून बाद झाला. ऋतुराजचे चार धावांनी अर्धशतक हुकले. त्याने ३६ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४६ धावा करून बाद झाला.
यानंतर चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर शिवम दुबे नावाचे वादळ आले. त्याने पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजीला सुरुवात केली. दुबेने अवघ्या २२ चेंडूत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावले. मात्र, अर्धशतक झळकावल्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने आपली विकेट गमावली. दुबेने २३ चेंडूत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. दुबेने चौथ्या विकेटसाठी डॅरिल मिशेलसोबत ५७ धावांची भागीदारी केली. दुबे बाद झाल्यानंतर समीर रिझवी फलंदाजीला आला आणि त्यानेही छोटी पण उपयुक्त खेळी खेळली. त्याने सहा चेंडूत दोन षटकारांच्या मदतीने १४ धावा करून बाद झाला. मिशेलने १० चेंडूत नाबाद २४ धावा केल्या आहेत. जाडेजाने तीन चेंडूत सात धावा केल्या. गुजरातकडून राशिदने दोन विकेट्स घेतल्या. तर साई किशोर, स्पेन्सर जॉन्सन आणि मोहित शर्मा यांना प्रत्येकी एक- एक विकेट मिळाली.
गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली नाही आणि पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावले. दीपक चाहरने सुरुवातीचे दोन विकेट्स घेत गुजरातच्या संघाला बॅकफुटवर ढकललं. चाहरने तिसऱ्या षटकात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल (०८ धावा) आणि पाचव्या षटकात यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (२१) यांना बाद केले. यानंतर डॅरिल मिशेल विजय शंकरला (१२ धावा) आपल्या जाळ्यात अडकवले. यानंतर गुजरातच्या संघाने ठराविक अंतराने विकेट गमावली. ज्यामुळे संघाला २० षटकांत फक्त १४३ धावा करता आल्या. गुजरातकडून साई सुधारनने सर्वाधिक ३७ धावा केल्या. तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी दोन- दोन विकेट घेतल्या.
संबंधित बातम्या