मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  पंतप्रधान मोदींच्या मोहिमेत सचिनची एन्ट्री, पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी शेअर केले कोकणचे सुंदर फोटो

पंतप्रधान मोदींच्या मोहिमेत सचिनची एन्ट्री, पर्यटकांना आकर्षिक करण्यासाठी शेअर केले कोकणचे सुंदर फोटो

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 07, 2024 05:23 PM IST

Sachin Tendulkar Tweet for Explore India : लक्षद्वीपला खूप कमी पर्यटक भेट देतात. पण अशातच आता भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर देखील पंतप्रधान मोदींच्या या मोहिमेत सामील झाला आहे. सचिनने ट्विटरवर याबाबत एक ट्विट केले आहे.

Sachin Tendulkar Tweet for Explore India
Sachin Tendulkar Tweet for Explore India

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे लक्षद्वीपला (Narendra Modi Lakshadweep) भेट दिली. पंतप्रधान मोदींनी तेथील किनारपट्टीच्या सौंदर्याचा आनंद लुटला. यासोबतच त्यांनी भारतीय पर्यटकांना त्या ठिकाणांना भेट देण्यासाठी प्रेरित केले आहे.

लक्षद्वीपला खूप कमी पर्यटक भेट देतात. पण अशातच आता भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर देखील पंतप्रधान मोदींच्या या मोहिमेत सामील झाला आहे. सचिनने ट्विटरवर याबाबत एक ट्विट केले आहे.

सचिनच्या ट्विटमध्ये नेमकं काय?

सचिन तेंडुलकरने ट्विट करत लिहिले की, 'सिंधुदुर्गमध्ये माझा ५० वा वाढदिवस साजरा करून २५० दिवस झाले आहेत! या किनारपट्टीच्या शहराने आम्हाला हवे ते सर्व दिले. आमच्या आठवणींचा खजिना हा सुंदर ठिकाणं आणि उत्कृष्ट आदरातिथ्याने भरलेला आहे. भारताला सुंदर किनारपट्टी आणि मूळ बेटांचा आशीर्वाद आहे. आपल्या "अतिथी देवो भव" तत्वज्ञानासह, आपल्याकडे पाहण्यासारखं खूप काही आहे."

सचिनच्या या ट्विटवर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या आहेत. तसेच, मोदी आणि सचिनच्या पुढाकारानंतर भारतीय पर्यटन विभागाला नक्कीच अच्छे दिन येतील, अशी आशा आहे.

दरम्यान, सचिन तेंडुलकर जगातील सर्वात महान फलंदाजांपैकी आहे. सचिन पहिल्या सीझनपासून आयपीएल फ्रँचायझीशी संबंधित आहे. तो मुंबई इंडियन्सकडू खेळत असे. त्यानंतर तो एमआयच्या कोचिंग स्टाफमध्ये रुजू झाला.

सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव

सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी २०० कसोटी, ४६३ एकदिवसीय आणि १ टी-20 सामना खेळला आहे. सचिनने कसोटीत ५१ शतके आणि ६८ अर्धशतकांसह एकूण १५९२१ धावा आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिनने ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांसह १८४२६ धावा केल्या आहेत. सचिन त्याच्या एकमेव टी-20 सामन्यात १० धावा करून बाद झाला होता.

याशिवाय सचिन तेंडुलकरलाही आयपीएलचा चांगला अनुभव आहे. त्याने ७८ आयपीएल सामने खेळले आहेत, यात त्याने ३४ च्या सरासरीने २३३४ धावा केल्या आहेत. सचिनच्या नावावर आयपीएलमध्ये १ शतक आणि १३ अर्धशतकं आहेत.

WhatsApp channel