टीम इंडियातील अनेक स्टार खेळाडू त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे. वनडे आणि कसोटीतही त्यांची कारकीर्द आता फार काळ उरलेली नाही. असेच काहीसे रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन सारख्या खेळाडूंच्या बाबतीत आहे.
दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याच्या नवीन क्रिकेट अकादमीचे उद्घाटन केले. हा सोहळा गुरुवारी (३ ऑक्टोबर) अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जामखेडच्या राशीन येथे घडला. विशेष म्हणजे ही क्रिकेट अकादमी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात आहे.
या उद्घाटनप्रसंगी रोहित शर्माने भारतीय क्रिकेटच्या भविष्यावर भाष्य केले. येथूनच पुढील शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि जसप्रीत बुमराह उदयास येतील, असे तो म्हणाला. रोहितच्या वाक्यानंतर जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.
दरम्यान, रोहित शर्माची आणखी एक कृती चांगलीच चर्चेत आली आहे. या कृतीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून मराठी जनतेला रोहित शर्माचे हे कृत्य चांगलेच भावले आहे.
वास्तविक, राशीन येथे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाचे भूमिपूजन करण्यात आले. तत्पूर्वी, मंचावर सर्व महापुरूषांचे फोटो लावले होते. रोहित मंचावर आल्यानंतर त्याने हे फोटो पाहून सर्वप्रथम आपल्या पायातील बुट काढले. आणि त्यानंतर सर्वच महापुरूषांना हात जोडून अभिवादन केले. आता रोहित शर्माच्या या कृतीचे प्रचंड कौतुक होत आहे.
रोहित शर्माने महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात आपली नवीन क्रिकेट अकादमी उघडली आहे. त्याच्या उद्घाटनावेळी रोहित म्हणाला, 'या नवीन अकादमीचे उद्घाटन करण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे. मी खात्री देतो की पुढील शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि जसप्रीत बुमराह येथूनच पुढे येतील.
यावर्षी भारताने 'टी-20 विश्वचषक जिंकला. जूनमध्ये बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडिया चॅम्पियन बनली होती. एकेकाळी दक्षिण आफ्रिकेचा विजय निश्चित वाटत होता पण भारताने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली.
टी-20 विश्वचषक विजयाच्या आठवणी सांगताना रोहित शर्मा म्हणाला, ‘विश्वचषक जिंकणे हे आमचे मुख्य लक्ष्य होते. एकदा आम्ही विश्वचषक जिंकल्यानंतर मला पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटले’.
भारतीय संघाने कसोटी मालिकेत बांगलादेशचा २-० असा पराभव केला. रोहितची बॅटिंग अपयशी ठरली पण त्याच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक झाले. आता भारताला बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. रोहितने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.
या टी-20 मालिकेनंतर न्यूझीलंड संघाचा भारत दौरा आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
संबंधित बातम्या