Cricketer Fabian Allen Robbed At Gunpoint : दक्षिण आफ्रिकेत सध्या त्यांची क्रिकेट लीग दक्षिण आफ्रिका क्रिकेट लीगचा (SA20) थरार सुरू आहे. पण या स्पर्धेदरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. या स्पर्धेतील एका खेळाडूला बंदुकीचा धाक दाखवून लुटण्यात आले आहे. ही घटना जोहान्सबर्ग येथे घडली आहे. या घटनेनंतर दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमधील खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
वेस्ट इंडिजचा क्रिकेटर फॅबियन अॅलन याच्यासोबत ही घटना घडली. २८ वर्षीय फॅबियन अॅलन SA20 लीगमधील पार्ल रॉयल्स संघाचा भाग आहे.
क्रिकबझच्या बातमीनुसार, जोहान्सबर्गमधील प्रसिद्ध सँडटन सन हॉटेलजवळ वेस्ट इंडिजचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर फॅबियन अॅलनला लुटण्यात आले. बंदुकधारी दरोडेखोरांनी फॅबियन ऍलनला गाठून त्याच्या फोन आणि बॅगसह त्याच्या वैयक्तिक वस्तू जबरदस्तीने हिसकावून घेतल्या. सुदैवाने या घटनेत ॲलनला कोणतीही इजा झाली नाही.
पार्ल रॉयल्स आणि वेस्ट इंडिज क्रिकेटनेही या घटनेला दुजोरा दिला आहे. क्रिकेट वेस्ट इंडिजच्या सूत्राने सांगितले की, ॲलनला दुखापत झालेली नाही. त्याच्याशी संपर्क साधला असून तो ठीक असल्याची माहितीही त्यांनी दिली. मात्र, या घटनेबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
फॅबियन ऍलनने वेस्ट इंडिजकडून आतापर्यंत २० एकदिवसीय आणि ३४ टी-20 सामने खेळले आहेत. या २० एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २०० धावा केल्या आहेत आणि ७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर टी-20 मध्ये त्याने २६७ धावांसह २४ विकेट घेतल्या आहेत. फॅबियन ऍलन आयपीएलमध्येही खेळला आहे.