आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ पाकिस्तान होणार आहे. आयसीसीच्या या मेगा इव्हेंटमध्ये ८ संघ एकमेकांना भिडणार आहेत. मात्र, यावेळी अनेक मोठे संघ या स्पर्धेत पात्रता फेरीतूनच बाहेर पडले.
या संघांमध्ये असेही संघ आहेत, ज्यांनी टी-20 आणि वनडेचे वर्ल्डकप जिंकले आहेत. चला तर मग जाणून घेऊया २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणकोणते बलाढ्य संघ अपात्र ठरले आहेत.
यामध्ये पहिले नाव वेस्ट इंडिजचे आहे. वेस्ट इंडिज संघाने दोनदा एकदिवसीय विश्वचषक आणि दोनदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. अशा स्थितीत वेस्ट इंडिजला स्पर्धेसाठी पात्रता न मिळणे धक्कादायक आहे.
यादीतील दुसरा सर्वात मोठा संघ म्हणजे विश्वचषक विजेता संघ श्रीलंका. श्रीलंकेने एकदिवसीय आणि T20 विश्वचषक जिंकले आहेत, परंतु २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र होऊ शकले नाहीत.
याशिवाय आयर्लंड, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे हे संघही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकलेले नाहीत.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण ८ संघ पात्र ठरले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी झालेल्या वनडे विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल ८ क्रमांकावर असलेले संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरतात. यात एक यजमान देशाचाही समावेश आहे. यजमानपद सोडून उर्वरित ७ संघांना विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल-८ मध्ये राहावे लागते.
२०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा संघ टॉप-८ मध्ये स्वतःला कायम ठेवू शकला नाही. संघाने एकदिवसीय विश्वचषकाचा प्रवास ९व्या स्थानावर संपवला. याशिवाय वेस्ट इंडिज, आयर्लंड, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वे हे संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरू शकले नव्हते. अशा स्थितीत हे सर्व संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही पात्र ठरू शकले नाहीत.
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला.
पाकिस्तान (यजमान), अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले आहेत.