Team India ICC Womens T20 World Cup Semi Final Scenario : आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील साखळी फेरीतील १२ व्या सामन्यात श्रीलंकेचा ८२ धावांनी पराभव केल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, यासाठी कडवे आव्हान संघापुढे राहणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय चाहत्यांच्या आशांना मोठा धक्का बसला होता. त्याचबरोबर टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध नेट रनरेटमध्ये फारशी सुधारणा करता आली नाही. पण आशियाई चॅम्पियन संघाविरुद्ध भारताने चांगली कामगिरी करत आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या अ गटातील गुणतालिकेत भारत ऑस्ट्रेलियानंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
टीम इंडियाने विश्वचषकाच्या साखळी फेरीत आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यात त्यांनी दोन जिंकले आहेत आणि एका सामन्यात पराभव पत्करला आहे. गुणतालिकेत भारत ४ गुण आणि +०. ५७६ च्या नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या साखळी फेरीतील पुढचा आणि शेवटचा सामना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार असल्याने भारतीय संघापुढ तगडं आव्हान आहे. या सामन्यानंतरच टीम इंडियाचे सेमीफायनलचे स्थान पक्के होणार आहे.
टीम इंडियाचा शेवटचा सामन्यात रविवारी १३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाच्या संघाशी भिडणार आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची आशा कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला सामना जिंकण्याबरोबरच नेट रन रेट वरही लक्ष ठेवावे लागणार आहे.
अ गटात सध्या ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची सर्वाधिक शक्यता आहे. कारण संघाने आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत आणि त्यांचा नेट रन रेट +२.५२४ च्या स्पर्धेत सर्वाधिक आहे. ऑस्ट्रेलियाचे उर्वरित दोन सामने भारत आणि पाकिस्तानविरुद्ध आहेत. हे दोन्ही सामने जिंकून बाद फेरी गाठण्याचे लक्ष्य संघाचे राहणार आहे. तर नेट रन रेटमुळे एकाही सामन्यात पराभव झाला तर त्यांची उपांत्य फेरीगाठण्याची शक्यता ही सर्वाधिक राहणार आहे.
सध्या या गटात भारताव्यतिरिक्त न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे दोन संघ आहेत ज्यांना जास्तीत जास्त ६-६ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीगाठण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण त्यांचे पुढील दोन सामने हे बलाढ्य न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत.
तर न्यूझीलंडला आपल्या दोन सामन्यांपैकी एक सामना पाकिस्तानविरुद्ध आणि एक सामना श्रीलंकेविरुद्ध खेळायचा आहे. किवी संघाने हे दोन्ही सामने जिंकले तर ते ६ गुणांपर्यंत पोहोचू शकतात. या दोन आशियाई संघांपैकी कोणताही संघ न्यूझीलंडविरुद्ध उलटफेर करण्यात यशस्वी ठरला तर भारताच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता आणखी वाढणार आहे.
न्यूझीलंड २ सामन्यांत १ विजय आणि १ पराभवासह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. संघाचा नेट रन रेट -०.०५०50 आहे, ज्यात येणाऱ्या सामन्यात त्यांनी विजय मिळवल्यास त्यांचे गुण तालिकेतील स्थान मजबूत होणार आहे. जर भारत आणि न्यूझीलंड संघाने आपले उर्वरित सामने जिंकले तर ६ गुणांनंतर नेट रन रेटवर अंतिम फेरीत कोणता संघ जाईल हे ठरणार आहे. दुसरीकडे, दोन्ही संघ १-१ ने पराभूत झाले तर ४ गुणांसह नेट रन रेटवर दोन्ही सांघाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
याशिवाय भारताने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत केले आणि न्यूझीलंडने एकाही सामन्यात पराभव पत्करला तर भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल. दुसरीकडे न्यूझीलंडने दोन्ही सामने जिंकले आणि भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला शेवटचा सामना गमावला तर टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडेल.
महिला टी-२० विश्वचषकात १० संघ सहभागी असून यामध्ये २ संघ सेमीफायनलमधून बाहेर पडले आहेत. श्रीलंका आणि स्कॉटलंड हे दोन संघ आतापर्यंत एकही सामना जिंकू शकलेले नाहीत. अ गटात श्रीलंका आणि ब गटात स्कॉटलंडने पराभवाची हॅटट्रिक केली आहे. आता उर्वरित ८ संघांमध्ये उपांत्य फेरीची शर्यत सुरू आहे.
संबंधित बातम्या