Bruce Murray Catch : क्रिकेटमध्ये पंचांचा निर्णय अंतिम असतो. पण अगदी कमी वेळेत निर्णय देणे हे निश्चित सोपे काम नाही. किंबहुना, क्रिकेटच्या मैदानावर अनेकवेळा असे दिसून आले आहे की, निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी अंपायरला थर्ड अंपायरकडे जावे लागते, त्यानंतरही निर्णय देण्यासाठी खूप विचार करावा लागतो.
दरम्यान, एका सामन्यात एक विचित्र प्रसंग घडला होता. ज्याची बरीच चर्चादेखील झाली होती.
वास्तविक, एका सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षकाच्या एका हातात केळी होती आणि तरीही त्याने झेल पकडला. आता पंचाचा निर्णय काय असेल?
ही गोष्ट १९६९ सालची आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने होते. एका हातात केळी असतानाही न्यूझीलंडचा क्रिकेटर ब्रूस मरे याने झेल घेतला.
ढाका येथे पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात होता. न्यूझीलंडचा कर्णधार ग्रॅहम डॉलिंग याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यात न्यूझीलंडचा ब्रूस मरे थर्ड मॅनवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षक मरे याच्यावर फळं फेकत होते. यानंतर तो त्याच्या कॅप्टनकडे गेला. किवी कर्णधाराने पंच शुजा उद्दीन सिद्दीकी आणि दाऊद खान यांच्याकडे तक्रार केली आणि असेच चालू राहिल्यास आपला संघ सामना सोडून निघून जाईल, असे सांगितले.
या दरम्यान, एक केळी थेट मरे याच्या मानेवर येऊन लागली. त्यावेळी डेल हॅडली गोलंदाजी करत होता. मरेने केळी उचलली आणि खेळपट्टीच्या दिशेने धावू लागला. गोलंदाज गोलंदाजी करत असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही.
फिल्डर धावत येत असल्याचे कर्णधाराच्या लक्षात आले त्याने, गोलंदाजाला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण उशीर झाला होता, गोलंदाजाने चेंडू टाकला. फलंदाजाने त्या चेंडूवर शॉट खेळला. चेंडू ब्रुस मरेच्या दिशेने येते होते, तेवढ्यात त्याने डाइव्ह मारून अप्रतिम झेल पकडला.
मग काय... न्यूझीलंडच्या क्षेत्ररक्षकांनी आनंदाने जल्लोष केला, पण अंपायरने तो तो झेल स्वीकारण्यास नकार दिला आणि तो डेड बॉल घोषित केला.