Mithali Raj on Marriage : भारतीय महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेणारी क्रिकेटपटू मिताली राज ही भारतीय तरुणींसाठी आयकॉन आहे. क्रिकेटच्या मैदानावरील पराक्रमामुळं चर्चेत राहणारी आता एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. मिताली राज हिनं आपल्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. वयाची चाळिशी उलटल्यानंतरही लग्न का केलं नाही याचं उत्तर तिनं दिलं आहे.
रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये ती बोलत होती. रणवीरनं तिला लग्नाबद्दल काही प्रश्न विचारले. कधी तुझा कांदापोह्याचा (मुलगी पाहण्याचा) कार्यक्रम झाला होता. अरेंज मॅरेजसाठी कुटुंबीयांनी प्रयत्न केले होते का? असं तिला विचारण्यात आलं. त्यावर तिनं मनमोकळी उत्तरं दिली.
'गाठीभेटी किंवा बघण्याचे कार्यक्रम झाले नाही. पण एकदा एका मुलाशी फोनवरून चर्चा झाली होती. माझ्या मावशीनं त्याच्याशी फोन जोडून दिला होता. तिचं ऐकून मी बोलले. सुरुवातीला त्या मुलानं माझ्या तब्येतीची विचारपूस केली. नंतर लग्नानंतरच्या आयुष्यावर प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुला किती मुलं हवी आहेत, अशी विचारणा केली. त्या प्रश्नामुळं मी थोडी बॅकफूटवर गेले. कारण तोपर्यंत मी लग्नानंतरच्या आयुष्याची कल्पनाही केली नव्हती. मी या सगळ्याचा विचारही केला नव्हता. क्रिकेटभोवतीच माझं आयुष्य फिरत होतं. भारतासाठी खेळत राहायचं आणि त्यासाठी वर्कआऊट आणि इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करायचं एवढंच मला माहीत होतं, असं मिताली म्हणाली.
ती पुढं म्हणाली, ‘लग्न या गोष्टीचा मी कधी फारसा विचार केला नाही किंवा त्यावर चर्चाही झाली नाही. त्यामुळं मुलं किती हवी हा प्रश्न मला आश्चर्यचकित करणारा होता. त्यावेळी मी भारतीय संघाची कर्णधार होते. तुम्हाला क्रिकेट सोडावं लागेल, कारण लग्नानंतर तुम्हाला मुलांचा सांभाळ करावा लागतो, असं तो मुलगा म्हणाला. मी त्याला समजून घेतलं. मात्र, त्यानंतर त्यानं आणखी एक विचित्र प्रश्न विचारला. माझ्या आईला काही झालं तर तू क्रिकेट खेळायला जाशील की की आईला भेटायला? मी त्याला विचारलं की हा काय प्रश्न आहे. त्यावर तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे मला कळायला हवं. त्याच्या या प्रश्नावर मी तेव्हा काय उत्तर दिलं मला आठवत नाही, मात्र यानंतर लग्न या विषयातला माझा इंट्रेस्टच निघून गेला.’
मिताली राज हिच्या नावावर महिला क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आहेत. महिला क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यात तिचा मोलाचा वाटा आहे. जवळपास २० वर्षे तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं मैदान गाजवलं आहे. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ती सर्वाधिक धावा (१०८६८) करणारी फलंदाज आहे. २०२२ मध्ये तिनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना खेळला होता.
संबंधित बातम्या