श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू दुलिप समरवीरा यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) २० वर्षांसाठी क्रिकेटमधील कोणत्याही प्रशिक्षकपदावर राहण्यास बंदी घातली आहे. समरवीरावर आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनाचा आरोप आहे, ज्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने "अत्यंत निषेधार्ह" असे वर्णन केले आहे.
या बंदी अंतर्गत आता समरवीराला क्रिकेट ऑस्ट्रेलिया, राज्य संघटना, बिग बॅश लीग (BBL) किंवा महिला बिग बॅश लीगच्या (WBBL) कोणत्याही संघाचा प्रशिक्षक बनता येणार नाही किंवा कोणत्याही पदावर नियुक्ती करता येणार नाही.
५२ वर्षीय दुलिप समरवीरा यांनी १९९३ ते १९९५ दरम्यान श्रीलंकेसाठी ७ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले. यानंतर ते व्हिक्टोरिया महिला क्रिकेट संघ आणि मेलबर्न स्टार्स WBBL संघाचे सहाय्यक प्रशिक्षक होते.
या वर्षाच्या सुरुवातीला, समरीवीरा यांना व्हिक्टोरिया महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले होते, परंतु दोन आठवड्यांच्या आत त्यांनी राजीनामा दिला. त्यांना स्वत:चे कर्मचारी नेमायचे होते. पण ते राज्य क्रिकेटच्या धोरणांमुळे मंजूर झाले नाही. यानंतर त्यांच्यावर गंभीर आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, पण ही वेगळी बाब होती.
दुलीप समरवीरा यांच्यावर करण्यात आलेली कारवाई वेगळ्या प्रकरणात आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहिता आयोगाच्या तपासणीत समरवीराने कलम २.२३ चे उल्लंघन केल्याचे आढळून आले, जे खेळाडूंसोबत अयोग्य वर्तनाशी संबंधित आहे.
त्यांच्या वर्तनाचा संपूर्ण तपशील सार्वजनिक केला गेला नाही. पण त्याचे वर्णन "जबरदस्ती" आणि अयोग्य असे केले गेले आहे, ज्याचा खेळाडूवर नकारात्मक परिणाम झाला.
क्रिकेट व्हिक्टोरियाचे सीईओ निक कमिन्स यांनी या निर्णयाचे समर्थन केले आणि दुलिप समरवीरा यांचे वर्तन "अत्यंत निंदनीय" म्हटले. ते म्हणाले, “आचारसंहिता आयोगाने घेतलेला निर्णय योग्य असून आम्ही या निर्णयाचे समर्थन करतो.
समरवीरा यांचे वर्तन आमच्या मूल्यांच्या विरोधात आहे आणि क्रिकेट व्हिक्टोरियामध्ये ते कधीही सहन केले जाणार नाही.
निक कमिन्स यांनी समरवीरा यांच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या खेळाडूंचेही कौतुक केले आणि म्हटले की, "खेलळाडूला दाखवलेले धैर्य कौतुकास्पद आहे. आम्ही तिला भविष्यातही सर्वतोपरी मदत आणि पाठिंबा देऊ."