IND-W vs PAK-W Women’s Asia Cup 2024 : भारताने महिला आशिया चषक स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. भारतीय महिला संघाने आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तान महिला संघाचा ७ विकेट्सने पराभव केला. १०९ या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १५ व्या षटकातच विजय मिळवला. भारताकडून स्मृति मंधाना (४५) आणिशेफाली वर्मा (४०) यांनी धडाकेबाज खेळी केली. महिला आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर १२ वा विजय आहे. महिला आशिया चषक श्रीलंकेत खेळला जात आहे.
महिला टी-20 आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेल्या भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. प्रथम गोलंदाजी करताना भारताने पाकिस्तानला १०८ धावांवर रोखले आणि त्यानंतर तब्बल ३५ चेंडू शिल्लक असताना विजयावर शिक्कामोर्तब केले.
१०९ धावांचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीर शेफाली वर्मा (४०) आणि स्मृती मंधाना (४५) यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघींनी चौकार आणि षटकार मारत धावफलक हालता ठेवला. मंधाना आणि शेफाली या जोडीने तुबा हसनच्या चेंडूवर दोन चौकार आणि एक षटकार ठोकून सहाव्या षटकात १५ धावा वसूल केल्या.
हसनने टाकलेल्या सातव्या षटकात २१ धावा मिळाल्या आणि या षटकात मंधानाने पाच चौकार ठोकले. अखेर दहाव्या षटकात मंधानाच्या रूपात पाकिस्तानला पहिले यश मिळाले. सय्यदा अरूब शाहच्या गोलंदाजीवर आलिया रियाजने तिचा झेल घेतला.
शेफाली १२ व्या षटकात बाद झाली, पण तोपर्यंत तिने आणि मंधानाने विजयाची पायाभरणी केली होती. त्यानंतर दयालन हेमलता (१४) फार काळ टिकू शकली नाही, तिला हसनने नशरा संधूच्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, अनुभवी ऑफ स्पिनर दीप्ती शर्मा (३० धावांत ३ बळी), वेगवान गोलंदाज पूजा वस्त्रकार (३१ धावांत २ बळी) च्या जोरावर भारताने पाकला १०८ मध्ये गुंडाळले. गुल फिरोजाला कर्णधार हरमनप्रीतच्या चेंडूवर बाद केले. ऑफ स्पिनर श्रेयांका पाटीलने १४ धावात २ बळी घेतले.
पाकिस्तानकडून सिदरा अमीनने सर्वाधिक २५ धावा के्ल्या. तूबा हसन आणि फातिमा हसन यांनी प्रत्येकी २२-२२ धावांचे योगदान दिले. मुनीबा अली ११, निदा दार ८, आलिया रियाज ६ आणि गुल फिरोजा ५ धावा काढून तंबूत परतल्या. इराम जावेद भोपळाही फोडू शकली नाही. भारताकडून दीप्ति शर्माने ३ बळी घेतले तर रेणुका सिंह, पूजा वस्त्राकर आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या.