Chris Jordan hat trick vs USA highlights : टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये आज (२३ जून) अमेरिका आणि इंग्लंड आमनेसामने आहेत. सुपर ८ फेरीच्या या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने हॅट्ट्रिक घेतली. ख्रिस जॉर्डनच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर इंग्लंडने अमेरिकेचा डाव १८.५ षटकांत ११५ धावांत संपवला. १९ वे षटक टाकायला आलेल्या जॉर्डनने ५ चेंडूत ४ बळी घेतले.
त्याआधी बार्बाडोसच्या केनिंग्स्टन ओव्हलच्या मैदानावर इंग्लंडने नाणेफेक जिंकून अमेरिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, परंतु अमेरिकेची फलंदाजी अत्यंत खराब झाली.
अमेरिकेकडून नितीश कुमारने सर्वाधिक ३० धावा केल्या आणि कोरी अँडरसनने २९ धावा केल्या. अँडरसनने हरमीत सिंगसोबत सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली, पण हरमीत बाद होताच अमेरिकेचा डाव पत्त्यासारखा कोसळळा. हरमीतने २१ धावांचे योगदान दिले.
ख्रिस जॉर्डनने १९ व्या षटकात कोरी अँडरसन, अली खान, नॉथुश केन्झिगे आणि सौरभ नेत्रावलकर यांना बाद केले. अली, केंजिगे आणि नेत्रावळकर शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले. अमेरिकेच्या केवळ ५ फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला.
विशेष म्हणजे, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनचा जन्म बार्बाडोसमध्ये झाला. त्याचे बालपण तिथेच गेले. पण नंतर तो अभ्यासासाठी इंग्लंडला पोहोचला आणि तिथेच स्थायिक झाला. T20 विश्वचषक २०२४ कॅरेबियन देशांमध्ये आयोजित केला जात आहे. बार्बाडोसमध्येच इंग्लंड अमेरिकेविरुद्ध सुपर-८ मधील शेवटचा सामना खेळत आहे.
ख्रिस जॉर्डन हा T20 मध्ये हॅट्ट्रिक घेणारा पहिला इंग्लंडचा गोलंदाज ठरला आहे. त्याने १९व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अली खानला बोल्ड केले. पुढच्याच चेंडूवर अमेरिकेचा फिरकी गोलंदाज नोस्टुश केन्झिगे एलबीडब्ल्यू झाला. त्याने डीआरएस घेतला पण तो निर्णयात बदल होऊ शकला नाही. त्यानंतर जॉर्डनने सौरभ नेत्रावलकरला क्लीन बोल्ड करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. त्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने स्फोटक फलंदाज कोरी अँडरसनलाही बाद केले होते.
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, २००७
कर्टिस कॅम्फर (आयर्लंड) विरुद्ध नेदरलँड, अबू धाबी, २०२१
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह, २०२१
कागिसो रबाडा (SA) विरुद्ध इंग्लंड, शारजाह, २०२१
कार्तिक मयप्पन (UAE) विरुद्ध श्रीलंका, गिलॉन्ग, २०२२
जोशुआ लिटल (आयर) विरुद्ध न्यूझीलंड, ॲडलेड, २०२२
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, २०२४
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध अफगाणिस्तान, सेंट लुसिया, २०२४
ख्रिस जॉर्डन (इंग्लं) विरुद्ध अमेरिका, बार्बाडोस, २०२४
संबंधित बातम्या