Chris Gayle : वेस्ट इंडिजचा स्फोटक क्रिकेटर ख्रिस्तोफर हेन्री गेल आज (२१ सप्टेंबर) त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. २१ सप्टेंबर १९७९ ला जमैकामध्ये जन्मलेला गेल त्याच्या आलीशान जीवनशैलीमुळे चर्चेत असतो. सक्रिय क्रिकेटपासून दूर राहूनही त्याने आजपर्यंत निवृत्ती घेतलेली नाही. गेलची लक्झरी लाइफ, प्लेबॉय इमेज, महागड्या गाड्या आणि रंगीबेरंगी पार्ट्यांचे शौक तुम्हाला थक्क करतील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेलची एकूण संपत्ती ३७३ कोटी रुपये आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की ख्रिस्तोफर गेल किंवा त्याचे कुटुंब सुरुवातीपासून इतके श्रीमंत कधीच नव्हते.
ख्रिस गेलचे वडील पोलिसात होते, तर आई चिप्स विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. सहा मुलांमध्ये ख्रिस हा पाचवा होता. असे नव्हते की ख्रिस गेलचे कुटुंब खूप गरीब होते किंवा जगणे कठीण होते. पण मध्यमवर्गीय कुटुंबांत जास्त मुले जन्मल्यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागले. मुलांचे चांगले संगोपन करण्यासाठी आईने चिप्स बनवण्याचा साईड बिझनेस सुरू केला. आर्थिक संकटाच्या काळात गेलने काही दिवस कचरा उलण्याचेही काम केले. तसेच उदर्निवाहासाठी एकदा त्याने एकदा चोरी केल्याचेही कबूल केले होते.
ख्रिस गेलच्या आई-वडिलांचा क्रिकेटशी काहीच संबंध नव्हता, पण ख्रिसचे आजोबा प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. ते त्यांच्या तरुणपणीच्या दिवसात क्लब क्रिकेट खेळायचे. त्यामुळे गेलचे क्रिकेटकडे आकर्षण वाढले. गेलला अभ्यासात रस नव्हता. अशा परिस्थितीत त्याने आपले सर्व लक्ष फक्त क्रिकेटवर केंद्रित करण्यास सुरुवात केली. जमैकामधील एक्सेलसियर हायस्कूलमधून पदवी घेतल्यानंतर तो लुकास क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला. स्थानिक सामन्यांमध्ये खेळून तो हळूहळू निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेऊ लागला. १९९८ मध्ये, त्याला वेस्ट इंडियन युवा आंतरराष्ट्रीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली.
पुढच्याच वर्षी म्हणजे १९९९ मध्ये ख्रिस गेलला वेस्ट इंडिज संघात स्थान मिळाले. २००१ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १७५ धावा ठोकून तो वेस्ट इंडिजचा हिरो बनला. त्यानंतर भारताविरुद्धच्या मालिकेत त्याने ३ शतके झळकावली. यानंतर मात्र ख्रिस गेलने कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. हार्ड हिटर असण्यासोबतच तो एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज देखील होता. वेस्ट इंडिजसाठी त्याने २८४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ९७२७ धावा तसेच १०३ कसोटी सामन्यांमध्ये ७२१४ धावा केल्या. आयपीएलमधील अनेक विक्रम आजही त्याच्या नावावर आहेत.
ख्रिस गेलची उंची ६ फूट आणि ४ इंच आहे. तो नाचतो आणि गातो आणि अलीशान पार्टी करतो. जमैकाच्या हिल्समध्ये त्याचा एक आलिशान बंगला आहे. या तीन मजली बंगल्यात स्विमिंग पूल तसेच पूल पार्ट्यांसाठी इनडोअर डान्स फ्लोर आहे, ज्याचा तो आपल्या मैत्रिणींसोबत आनंद घेतो. गेल लग्नाआधीच बाप झाला होता, त्याची गर्लफ्रेंड नताशा हिने २०१६ मध्ये एका मुलीला जन्म दिला.
ख्रिस गेलने आपले आत्मचरित्रही प्रसिद्ध केले आहे. गेलच्या आत्मचरित्राचे नाव 'सिक्स मशीन: आय डोन्ट लाइट क्रिकेट... आय लव्ह इट' असे आहे.
संबंधित बातम्या