IND vs AUS 3rd Test Brisbane : पर्थ कसोटीत विराट कोहलीने टीम इंडियासाठी शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या डावात त्याने नाबाद १०० धावा केल्या. मात्र यानंतर दुसऱ्या कसोटीत त्याला विशेष काही करता आले नाही. ॲडलेड कसोटीत कोहली लवकर बाद झाला.
त्याच्या बाद झाल्यावर चेतेश्वर पुजाराने प्रतिक्रिया दिली आहे. पुजाराने सांगितले की कोहली कशा पद्धतीने क्रिजवर जास्त वेळ टिकू शकतो. त्याने विराटचे कौतुकही केले. मात्र सोबतच तो बाद होण्याच्या शैलीवरही सविस्तरपणे सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात ७ धावा आणि दुसऱ्या डावात ११ धावा करून विराट बाद झाला. या दोन्ही डावात कोहली जवळपास सारख्याच पद्धतीने बाद झाला. पुजारा स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणाला, "मागील डावात कोहली मागे स्लिपमध्ये आऊट झाला. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूंवर कोहली बाद होतो, हे आता सर्वच गोलंदाजांना माहिती झाले आहे. हे कोहलीलाही माहिती आहे. यावर त्याने काम केले पाहिजे.
आता कोहली त्याची विकेट कशी वाचवू शकेल, याबाबत बोलताना पुजारा म्हणाला, “कोहलीला चांगला चेंडू सोडावा लागेल. बचाव करावा लागेल.'' पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात विराटने नाबाद १०० धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने १४३ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि २ षटकार मारले.
मात्र यानंतर तो काही विशेष करू शकला नाही. ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात कोहली केवळ ८ चेंडू खेळू शकला आणि ७ धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावात ११ धावा करून तो बाद झाला. या डावात त्याने २१ चेंडूंचा सामना केला.
आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात कोहली चमत्कार करू शकतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार पहाटे ५.५० वाजता सुरू होईल.
संबंधित बातम्या