इंडियन प्रीमियर लीग २०२४ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर सीएसकेने कोलकाताला ७ विकेट्सनी धूळ चारली आहे. केकेआरचा यंदाच्या मोसमातील हा पहिलाच पराभव आहे.
तर सीएसकेचा संघ सलग दोन पराभवानंतर विजयी मार्गावर परतला आहे. तत्पूर्वी, या सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करताना केवळ १३७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चेन्नईने १७.४ षटकांत केवळ ३ विकेट्स गमावून लक्ष्याचा सहज पाठलाग केला.
सीएसकेकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने ५८ चेंडूत नाबाद ६७ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. तर शिवम दुबेने १८ चेंडूत २८ धावा केल्या. चेन्नईचा या मोसमातील हा तिसरा विजय आहे, तर केकेआरचा पहिला पराभव आहे. केकेआरकडून वैभव अरोराने २ आणि सुनील नरेनने १ बळी घेतला.
या विजयानंतर चेन्नईचा संघ ५ सामन्यांतील ३ विजय आणि २ पराभवांसह ६ गुण मिळवून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, या पराभवानंतरही कोलकाता संघ ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
पहिल्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा संघ आहे, त्यांनी ४ सामन्यांत ४ विजय मिळवून ८ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहेत. आता या स्पर्धेत राजस्थानचा संघ असा एकमेव संघ आहे ज्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही.
कोलकाताकडून श्रेयस अय्यरने ३२ चेंडूत ३४, सुनील नरेनने २० चेंडूत २७ आणि अंगक्रिश रघुवंशीने १८ चेंडूत २४ धावा केल्या.
सुनील नरेनने अंगक्रिश रघुवंशीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. रघुवंशीने १८ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २४ धावांचे योगदान दिले. केकेआरसाठी नरेन आणि रघुवंशी यांच्यात केवळ अर्धशतकी भागीदारी झाली. पण ही भागीदारी तुटल्यानंतर केकेआरच्या डावाला गळती लागली. यानंतर ते शेवटपर्यंत सावरू शकले नाही.
चेन्नईकडून रवींद्र जडेजाने ४ षटकात १८ धावा देत ३ बळी घेतले. तुषार देशपांडेलाही तीन विकेट मिळाले.
संबंधित बातम्या