IPL 2025 CSK Retention List : आयपीएल २०२५ ची रिटेन्शन लिस्ट जाहीर होण्यापूर्वीपासूनच चेन्नई सुपर किंग्स (CSK) चर्चेत होती आणि आता रिटेन्शन लिस्ट जाहीर झाल्यानंतरही हा संघ चर्चेत आहे. यापूर्वी एमएस धोनी चर्चेचा केंद्रबिंदू होता, मात्र आता रविचंद्रन अश्विन केंद्रस्थानी आला आहे.
चेन्नईने एमएस धोनी, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि मथिशा पाथिराना यांना रिटेन केले आहे. आता लिलावासाठी CSK च्या पर्समध्ये ५५ कोटी रुपये शिल्लक आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्जसह इतर अनेक संघ यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर मोठी बोली लावू शकतात. तसेच, सीएसके रविचंद्रन अश्विनला परत आणण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसते. अश्विनने चेन्नईसाठी यापूर्वी ८ हंगाम खेळले आहेत.
दुसरीकडे, CSK ला टॉप ऑर्डर भारतीय फलंदाज आणि अनुभवी वेगवान गोलंदाजाची जागा भरायची आहे, त्यामुळे ते कोणत्याही खेळाडूवर १५-२० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक बोली लावू शकतात.
तसेच, काही काळापूर्वी अश्विनने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला पुन्हा एकदा त्याच्या जुन्या संघ म्हणजेच चेन्नई सुपर किंग्जकडून खेळायचे आहे.
दरम्यान, न्यूझीलंडचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हॉन कॉनवे याच्यावर CSK फ्रँचायझी राईट टू मॅच कार्ड खेळू शकते असेही एक अपडेट समोर आले आहे. अंगठ्याच्या दुखापतीमुळे कॉनवे मागील हंगामात खेळू शकला नव्हता, परंतु आयपीएल २०२३ मध्ये त्याने ५१.६९ च्या सरासरीने ६७२ धावा केल्या होत्या.
रविचंद्रन अश्विनबद्दल बोलायचे झाले तर, त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून ९७ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर ९० विकेट आहेत. या संघासाठी त्याने ११९० धावाही केल्या आहेत. पण जेव्हा CSK आणि राजस्थान रॉयल्सवर २०१६-२०१७ हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती, तेव्हापासून अश्विन चेन्नईकडून खेळलेला नाही.