चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरणार आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली.
यानंतर दोघांनीही मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे दिली. चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पाकिस्तानसोबतच युएईमध्येही सामने होणार आहेत. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध २० फेब्रुवारीला होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार) विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्विनी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
ऋषभ पंतच्या अपघातानंतर केएल राहुल वनडेत विकेटकिपींग करत होता. २०२३ च्या विश्वचषकातही राहुल कीपर होता. पण चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यष्टीरक्षणासाठी ऋषभ पंत पहिली पसंती असेल. याबाबत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, की चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड वनडे संघात ऋषभ पंत हा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पहिली पसंती आहे.
सिनीयर खेळाडू देशांतर्गत क्रिकेटपासून दूर का राहतात?- भारतीय संघात स्थान मिळताच खेळाडू देशांतर्गत क्रिकेटपासून दूर जातात. यावर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, गेल्या ६-७ वर्षांत फार कमी वेळा असे घडले आहे की जेव्हा वरिष्ठ संघातील खेळाडूंना विश्रांती मिळाली असेल. जेव्हा तुम्ही इतक्या वर्षांत इतके आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला विश्रांतीची गरज असते.
जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबतची स्थिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. अजित आगरकर यांनी सांगितले की, यासाठी आम्हाला फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. आम्ही जसप्रीत बुमराहच्या फिटनेसची वाट पाहत आहोत आणि बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला फेब्रुवारीच्या सुरुवातीला त्याच्या फिटनेसबद्दल कळेल.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. याबाबत रोहितला विचारले असता तो म्हणाला की मी खेळणार आहे. त्याने २०१६ मध्ये मुंबईसाठी शेवटचा रणजी सामना खेळला होता. २३ जानेवारीपासून मुंबईला जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळायचे आहे.
मोहम्मद सिराज हा भारतीय संघाच्या गोलंदाजीचा महत्त्वाचा भाग आहे. भारताकडून आतापर्यंत खेळलेल्या ४४ सामन्यांमध्ये ७१ बळी घेतले आहेत. यानंतरही सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान मिळालेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बुमराहच्या खेळण्याबाबत स्थिती स्पष्ट नाही आणि अशा स्थितीत हर्षित राणाला स्थान मिळाले आहे.
संबंधित बातम्या