टीम इंडियाला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत २-० अशा लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातील बहुतांश फलंदाज फ्लॉप ठरले. रोहित शर्माशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने चांगली फलंदाजी केली नाही.
टीम इंडियासमोर आता चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे आव्हान आहे. तसेच, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाकडे खूप कमी कालावधी आणि केवळ तीन वनडे सामनेच उरले आहेत.
अशा स्थितीत या आयसीसी इव्हेंट्समधून काही मोठी नावं वगळली जाऊ शकतात. शुभमन गिल, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर फॉर्ममध्ये नसतील तर टीम इंडियाला पर्यायी खेळाडूंची गरज भासू शकते.
शुभमन श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत सलामीवीर म्हणून खेळला होता. पण त्यााला विशेष काही करता आले नाही. गिल तिसऱ्या वनडेत अवघ्या ६ धावा करून बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो ३५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होता, तर पहिल्या वनडेत १६ धावा करून गिल बाद झाला. तो फॉर्ममध्ये नसेल तर टीम इंडियाला पर्यायी ओपनरची नक्कीच गरज भासेल. गिल बऱ्याच काळापासूून फॉर्मशी झुंजत आहे.
श्रेयस अय्यर दीर्घ कालावधीनंतर टीम इंडियात परतला. श्रीलंकेविरुद्धच्या तीनही सामन्यांपैकी तो प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. पण त्यालाही विशेष काही करता आले नाही. पहिल्या वनडेत २३ धावा करून बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अय्यर ७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याला केवळ ८ धावा करता आल्या. मधल्या फळीसाठी टीम इंडिया अय्यरकडे पाहत आहे. मात्र सध्या त्याचा फॉर्म खराब असल्याचे दिसत आहे.
केएल राहुल हा भारताचा अनुभवी खेळाडू आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये तो टीम इंडियासाठी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून खेळला. पण विशेष काही करू शकलो नाही. राहुल पहिल्या सामन्यात ३१ धावा करून बाद झाला. तर दुसऱ्या वनडेत तो शून्यावर बाद झाला. यानंतर त्याला तिसऱ्या वनडेतून वगळण्यात आले.