Team India For Champions Trophy : टीम इंडियाशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार चॅम्पियन्स ट्रॉफी संघाबाबत रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांची मते भिन्न होती. काही खेळाडूंवरून दोघांमध्ये वादही झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय संघ जाहीर होण्यापूर्वी सुमारे अडीच तास झालेल्या बैठकीबाबतही एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी १५ नावे आधीच ठरवली होती. मात्र, संघाची घोषणा होण्यापूर्वी सुमारे अडीच तास बैठक झाली. या बैठकीत काय झाले? याबाबत या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.
शनिवारी टीम घोषणेपूर्वी बीसीसीआयच्या मुंबई कार्यालयात दीर्घ बैठक झाली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्रशिक्षक गौतम गंभीर अष्टपैलू हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवू इच्छित होते, परंतु रोहित आणि आगरकर गिलच्या नावावर ठाम होते.
याशिवाय गंभीरला संजू सॅमसन याचा यष्टिरक्षक म्हणून संघात समावेश करायचा होता, पण यावरही कर्णधार आणि मुख्य निवडकर्त्याचे मत वेगळे होते. रोहित शर्मा आणि अजित आगरकर ऋषभ पंतच्या बाजूने होते तर गंभीरला संजू सॅमसनला घ्यायचे होते, ज्याने गेल्या वर्षी तीन टी-20 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली. यावरही जोरदार चर्चा झाली.
२०२३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि हार्दिक पंड्या संघाचा उपकर्णधार होता. त्यानंतर हार्दिकला दुखापत झाल्यावर केएल राहुलला उपकर्णधारपद मिळाले. मात्र, विश्वचषकानंतर रोहितला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवून हार्दिककडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. त्यानंतरच शुभमन गिलला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आले.
रोहितच्या टी-20 मधून निवृत्तीनंतर हार्दिक भारतीय टी-20 संघाचा कर्णधार बनणार होता, पण तरीही अचानकपणे सूर्यकुमार यादवकडे कमान सोपवण्यात आली.
रोहित आणि आगरकरला हार्दिकला कर्णधार बनवायचे नव्हते, असा दावा अनेक रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. याच कारणामुळे सूर्याकडे टी-20 ची कमान सोपवण्यात आली होती. तर, दैनिक जागरणने आपल्या सुत्रांचा हवाला देत हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. कोणत्याही खेळाडू, प्रशिक्षक, निवडकर्ता किंवा अधिकाऱ्याने याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही.
संबंधित बातम्या