टीम इंडियाची राधा यादव ही महिला क्रिकेटमधील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी आहे. तिला महिला क्रिकेटची रवींद्र जडेजा म्हणूनही ओळखले जाते. ती डाव्या हाताने ऑफस्पिन गोलंदाजी करते, तसेच, उजव्या हाताची फलंदाज आहे. दरम्यान, राधा यादवने ती क्रिकेट जगतातील सर्वोत्तम फिल्डर्सपैकी एक आहे, हे आज पुन्हा सिद्ध केले आहे.
वास्तविक, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे सामना खेळला जात आहे. वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात राधा यादवने अप्रतिम झेल घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही तिच्या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
महिला क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. यातील दुसरा सामना आज रविवारी (२७ ऑक्टोबर) अहमदाबादमध्ये होणार आहे.
अहमदाबाद वनडेत न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ब्रुक हॅलिडे संघाकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तर प्रिया मिश्रा भारताकडून ३२वे षटक टाकत होती.
मिश्राच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर ब्रूकने मोठा शॉट खेळला. चेंडू हवेत असल्याचे पाहून त्या ठिकाणी फिल्डिंग करत असलेल्या राधाने हवेत झेप मारून चेंडू पकडला. हा एक अतिशय कठीण झेल होता. या कॅचनंतर सोशल मीडियावर राधाचे कौतुक करण्यात येत आहे. बीसीसीआयच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
प्रिया मिश्राने टीम इंडियासाठी शानदार गोलंदाजी केली. तिने न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबाद वनडेमध्ये १० षटकांत ४९ धावांत १ बळी घेतला. यासह १ मेडन ओव्हरही टाकली. न्यूझीलंडकडून सुझी बेट्सने ५८ धावा केल्या. तिच्या अर्धशतकी खेळीत ८ चौकारांचा समावेश होता. जॉर्जिया प्लिमरने ४१ धावांचे योगदान दिले. कर्णधार सोफिया डिव्हाईनने अर्धशतक झळकावले.
संबंधित बातम्या