इंग्लंडच्या महान वेगवान गोलंदाजाने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. अँडरसनने इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले आहे की, या उन्हाळ्यात लॉर्ड्सवर खेळली जाणारी पहिली कसोटी ही त्याच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी असेल. अँडरसनने २००३ मध्ये करिअरचा पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. त्याची कारकीर्द जवळपास २० वर्षे चालली आहे.
वेस्ट इंडिजचा संघ यावर्षी इंग्लंडचा दौरा करणार असून ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना लॉर्ड्सवर खेळवला जाणार असून तो अँडरसनच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. अँडरसनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की या उन्हाळ्यात लॉर्ड्सवर होणारी कसोटी सामना माझी शेवटची कसोटी असेल."
इंग्रजी वृत्तपत्र द गार्डियनच्या वृत्तानुसार, इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी नुकतेच अँडरसनशी चर्चा केली होती. यात त्यांनी २०२५ च्या ऍशेस मालिकेबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी संघाच्या भविष्याचा विचार अँडरसनला संघात जागा मिळणार नसल्याचे सांगितले होते.
अँडरसन हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७०० बळी घेणारा तो पहिला वेगवान गोलंदाज आहे. आतापर्यंत त्याने इंग्लंडकडून १८७ कसोटी सामने खेळले असून ७०० विकेट्स त्याच्या नावावर आहेत.