Himanshu Sangwan On Virat Kohli : विराट कोहली नुकताच रणजी ट्रॉफीत खेळताना दिसला होता. विराटने १२ वर्षांनी दिल्लीसाठी रणजी ट्रॉफीचा सामना खेळला, पण या सामन्यात तो विशेष काही करू शकला नाही. रेल्वेविरुद्धच्या या सामन्यात कोहली केवळ ६ धावा करून बाद झाला. त्याला वेगवान गोलंदाज हिमांशू सांगवान याने क्लीन बोल्ड केले.
विराट कोहलीने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान रेल्वेविरुद्ध दिल्लीकडून खेळला. त्याची विकेट हिमांशू सांगवानने घेतली. विराटची विकेट घेतल्यानंतर हिमांशू सांगवान चांगलाच प्रकाशझोतात आला.
पण आता हिमांशूने विराटची विकेट घेण्यामागची कहाणी सांगितली आहे. सोबतच त्याने एक धक्कादायक खुलासाही केला आहे.
हिमांशू सांगवान म्हणाला, की "विराट कोहली आणि ऋषभ पंत दिल्लीसाठी खेळू शकतात, अशी चर्चा सामन्यापूर्वी झाली होती. नंतर कळले की ऋषभ खेळणार नसून विराट खेळणार आहे आणि सामना लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे. यानंतर मी विराटची विकेट घ्यावी, असे मला एका सदस्याने सांगितले.
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे हिमांशू सांगवान याला कोणत्याही प्रशिक्षक किंवा वरिष्ठ खेळाडूने नव्हे, तर संघाच्या बसच्या चालकाने विराट कोहलीला बाद करण्याचा सल्ला दिला होता.
हिमांशू म्हणाला, "बस ड्रायव्हरने मला विराट कोहलीला चौथ्या-पाचव्या स्टंप लाईनवर बॉलिंग करायला सांगितले. माझा स्वतःवर विश्वास होता. मी माझ्या ताकदीवर लक्ष केंद्रित केले आणि शेवटी त्याची विकेट घेतली."
विराट कोहलीची विकेट घेत एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या हिमांशू सांगवानसाठी इथपर्यंत पोहोचणे सोपे नव्हते. वयाच्या १३-१४ व्या वर्षी तो दिल्लीत आला आणि गेल्या १५ वर्षांपासून भाड्याच्या घरात राहत आहे. त्याच्या क्रिकेटच्या आवडीमुळे त्याला प्रत्येक संकटाशी लढण्याचे धैर्य मिळाले.
आपल्या संघर्षाबद्दल हिमांशू सांगवान म्हणाला, की "हा प्रवास सोपा नव्हता. मी जेव्हा दिल्लीत आलो तेव्हा मला खूप अडचणींचा सामना करावा लागला. पण मी कधीही हार मानली नाही. मी ज्या कुटुंबासोबत राहतो त्यांनी मला नेहमीच साथ दिली. माझ्या पाठीशी ते सदैव उभा राहिले."
संबंधित बातम्या