India vs Australia Day 5 Weather Brisbane : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळल्या जात असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील तिसरा कसोटी सामना आता रोमहर्षक वळणावर पोहोचला आहे. सामन्याचे ४ दिवस संपले आहेत. आता शेवटच्या दिवशी (१७ डिसेंबर) काय घडते हे पाहायचे आहे.
गाबा कसोटीत भारतीय संघ जिंकू शकण्याची शक्यता कमी आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन संघालाही विजय सोपा नाही. अशा स्थितीत गाबा टेस्टची ड्रॉकडे वाटचाल होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे, या सामन्यादरम्यान अनेकवेळा पावसाने हजेरी लावली आहे. आता, शेवटच्या दिवशी ब्रिस्बेनचे हवामान कसे असेल ते जाणून घेऊया.
हवामान अंदाजानुसार, बुधवारी ब्रिस्बेनमध्ये पाऊस पडू शकतो. मात्र, फारसा पाऊस पडण्याची शक्यता नाही. पावसामुळे सामना उशिरा सुरू होऊ शकतो, पण दिवसभर पाऊस पडणार नाही. सामन्यादरम्यान मधूनमधून पाऊस पडू शकतो.
गेल्या काही दिवसांपासून ब्रिस्बेनमध्ये सतत अधुनमधून पाऊस पडत आहे. अशा परिस्थितीत खराब हवामान आणि प्रकाशामुळे अनेकदा पंचांनी सामना लवकर संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ४४५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात आतापर्यंत ९ बाद २५२ धावा केल्या आहेत. टीम इंडिया अजूनही १९३ धावांनी पिछाडीवर आहे. मात्र, रवींद्र जडेजाचे अर्धशतक आणि जसप्रीत बुमराह-आकाशदीपच्या भागीदारीमुळे फॉलोऑनचा धोका टळला आहे.
आता भारतीय संघाला आकाशदीप आणि बुमराहने पाचव्या दिवशी जास्तीत जास्तवेळ फलंदाजी करावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सामना अनिर्णित राहण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, भारताला लवकर गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाला जवळपास दीड सत्र फलंदाजी करून भारतीय संघाला चांगले लक्ष्य द्यावे लागेल. यानंतर कांगारू संघ भारताला ऑल आऊट करण्याचा प्रयत्न करेल. सध्याच्या मालिकेत भारताची फलंदाजीही काही खास राहिलेली नाही.
संबंधित बातम्या