न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्क्युलम याची इंग्लंडच्या वनडे आणि टी-20 संघाच्या कोचपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मॅक्क्युलम आधी केवळ कसोटी फॉरमॅटसाठीच इंग्लंडचा हेड कोच होता.
टी-20 विश्वचषक २०२४ नंतर, मॅथ्यू मॉट्स यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला होता. यानंतर आता न्यूझीलंडचा अनुभवी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्युलम त्यांच्या जागी येणार आहे.
इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षक असलेला मॅक्युलम आता १ जानेवारी २०२५ पासून इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 संघांत 'बॅझबॉल' चा थरार आणणार आहे.
ब्रेंडन मॅक्क्युलमने इंग्लंडच्या कसोटी संघाची मानसिकता बदलली आहे कारण आता संघातील खेळाडू एकदिवसीय सामन्याप्रमाणे कसोटी सामन्यात खेळताना दिसतात. मॅक्युलमने या नवीन भुमिकेबद्दल आनंद व्यक्त केला आणि सांगितले की, नवीन भूमिकेत येण्याच्या वृत्ताने मी आनंदी आहे. नवीन करारानुसार मॅक्क्युलम २०२७ च्या अखेरीपर्यंत इंग्लंड संघाचा प्रशिक्षक राहील.
नवीन प्रशिक्षक म्हणून नियुक्तीबाबत मॅक्युलम म्हणाला, "मी हे नवीन आव्हान स्वीकारण्यास तयार आहे. मी कर्णधार जोस बटलरसोबत काम करण्यास उत्सुक आहे आणि संघाचा पाया मजबूत करण्यासाठी आतापासूनच निर्णय घेतले जात आहेत."
ब्रेंडन मॅक्युलम १ जानेवारी २०२५ पासून इंग्लंडच्या वनडे आणि टी-20 संघाच्या कोचपदाचा पदभार स्वीकारणार आहे, परंतु मॅथ्यू मॉट्सच्या रवानगीनंतर मार्कस ट्रेस्कोथिक हे इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या संघाचे अंतरिम प्रशिक्षक राहतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेत आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेदरम्यान मार्कस ट्रेस्कोथिक प्रशिक्षक म्हणून काम पाहतील.
मॅक्युलम जानेवारी २०२५ मध्ये भारताविरुद्धच्या मालिकेपासून वनडे आणि टी-20 संघांचे प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ सुरू करेल. मॅक्युलमच्या कार्यकाळात टी-20 विश्वचषक २०२६, एकदिवसीय विश्वचषक २०२७, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२७ या मोठ्या स्पर्धा होतील.
इंग्लंडच्या वनडे आणि टी-20 संघाच्या कोचपदासाठी रिकी पाँटिंग आणि इयॉन मॉर्गन हेही दावेदार होते. पण शेवटी बॅझबॉलचा निर्माता ब्रेंडन मॅक्क्युलमने बाजी मारली.