Abhishek Bachchan European T20 Premier League : बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन याने युरोपियन टी-20 प्रीमियर लीग (ETPL) मध्ये पैसे गुंतवले आहेत. या वर्षी सुरू होणाऱ्या या लीगचा तो सहमालक बनणार आहे. ETPL ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंजूर केलेली आहे आणि या स्पर्धेत आयर्लंड, स्कॉटलंड, नेदरलँड्स या देशांतील खेळाडूंसह जगभरातील अव्वल खेळाडू खेळताना दिसतील.
एका वृत्तपत्राच्या मते, युरोपियन टी२० प्रीमियर लीगमध्ये एकूण ६ संघ खेळणार आहेत. ही स्पर्धा १५ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान खेळली जाईल. हे संघ डब्लिन, बेलफास्ट, ॲमस्टरडॅम, रॉटरडॅम, ग्लासगो आणि एडिनबर्ग या शहरांचे प्रतिनिधित्व करतील.
अभिषेक बच्चनसारख्या नामवंत व्यक्तिमत्वाची भर पडल्याने या लीगला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख मिळणार आहे. अभिषेक बच्चन याच्या गुंतवणूकीने ETPL इतर गुंतवणूकदारांना तसेच भारतीय क्रिकेट चाहत्यांना आकर्षित करण्यास मदत होऊ शकते.
या नवीन उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करताना अभिषेक बच्चन म्हणाला, "क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही, तर ती देशांना एकत्र आणणारी एक शक्ती आहे. ईटीपीएल हे एक उत्तम व्यासपीठ आहे जे क्रिकेटच्या वाढत्या मागणीचे उत्तम प्रकारे प्रदर्शन करेल आणि या खेळाची लोकप्रियता वाढवण्यास आणखी हातभार लावेल."
ETPL मध्ये पैसे गुंतवण्याच्या अभिषेक बच्चनच्या निर्णयाचे आयर्लंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ETPL चेअरपर्सन वॉरन ड्युट्रोम यांनी स्वागत केले. ते म्हणाले, “अभिषेक बच्चन ईटीपीएलचे सह-मालक झाल्याचे जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. त्याची खेळाप्रती असलेली आवड आणि दूरदृष्टी युरोपियन क्रिकेटला नव्या उंचीवर नेण्यात खूप मोठा हातभार लावेल.”
अभिषेक बच्चनने पैसे गुंतवलेले ही पहिली लीग नाही. भारतात सुरू असलेल्या प्रो कबड्डी लीगमध्येही (PKL) तो जयपूर पिंक पँथर्सचा मालक आहे. अभिषेक बच्चनचा संघ दोनदा PKL चॅम्पियन ठरला आहे. यानंतर इंडियन सुपर लीगमध्येही चेन्नईयिन एफसीमध्ये त्याची भागिदारी आहे.
संबंधित बातम्या