क्रिकेटच्या मैदानातून एकाहून एक मजेशीर आणि थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणापासून ते नेत्रदीपक झेल आणि षटकार या व्हिडिओंमध्ये पाहायला मिळतात.
आता सोमवारी (१६ डिसेंबर) झालेल्या एका सामन्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. हा व्हिडिओ नेपाळ प्रीमियर लीगच्या सामन्याचा आहे. त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सोमवारी हा सामना खेळला गेला.
नेपाळ प्रीमियर लीगच्या २८ व्या सामन्यात आज सुदूर पश्चिम रॉयल्सचा सामना कर्नाली याक्सशी झाला.
हरमीत सिंगच्या शानदार गोलंदाजीमुळे याक्स संघ केवळ १०१ धावांत गारद झाला. सुदूर पश्चिम रॉयल्स संघाच्या हरमीत सिंगने ४ षटकात १७ धावा देत ३ बळी घेतले. पण त्याच्या तिसऱ्या विकेटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
कर्णाली याक्स संघाच्या २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हरमीत सिंगने चेंडू लेग साइडच्या दिशेने टाकला. अंपायरने तो वाइड बॉल घोषित केला. पण फलंदाज बिपिन शर्मा शॉट खेळण्यासाठी क्रीजबाहेर आला होता. पण तो बीट झाला.
अशा स्थितीत चेंडू यष्टिरक्षक विनोद भंडारी याच्या पायात अडकला. यानंतर चेंडू विकेटकीपरने ग्लोव्हजमध्ये घेतला पण फलंदाजाला हे समजले नाही. त्याला वाटले चेंडू विकेटकीपरच्या मागे गेला, यामुळे तो रन घेण्यासाठी धावला. पण लगेच विकेटकीपरने ग्लोव्हजमधील चेंडूने स्टंप उडवले आणि फलंदाजाला धावबाद केले.
चाहत्यांनी बिनोदच्या शहाणपणाचे कौतुक केले. त्याची महेंद्रसिंग धोनीशी तुलना केली जात आहे. कारण बिनोदही ७ क्रमांकाची जर्सी घालून मैदानात उतरतो. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर कर्णाली याक्स प्रथम फलंदाजी करताना १०१ धावांवर गारद झाले.
प्रत्युत्तरात सुदूर पश्चिम रॉयल्स संघाने ४ गडी गमावून लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून कर्णधार दीपेंद्र ऐरीने २९ चेंडूत ३८ धावांची खेळी खेळली. यादरम्यान त्याने ४ चौकार आणि १ षटकार लगावला. या पराभवानंतरही याक्स प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहेत.
संबंधित बातम्या