आयपीएल २०२५ मेगा लिलावात १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना खरेदी केले, तेव्हा बिहारचे समस्तीपूर शहर प्रसिद्धीझोतात आले. आता त्याच शहरातून आणखी एक नाव चर्चेत आले आहे.
आता याच शहरातून आणखी एक खेळाडू चर्चेत आला आहे. सुमन कुमार असे या खेळाडूचे नाव आहे. सुमनने एका डावात सर्व १० विकेट्स घेतल्या.
सुमनने कूचबिहार ट्रॉफीमध्ये राजस्थानविरुद्ध ही कामगिरी केली आहे. या अंडर १९ स्पर्धेत सुमनने असा धुमाकूळ घातला, की सर्वजण अवाक् झाले. एका डावात सर्व विकेट्स घेणे ही काही सोपी गोष्ट नाही. फार कमी लोकांना हे करता आले आहे. सुमनने हे अशक्यप्राय काम पूर्ण केले.
बिहारच्या या वेगवान गोलंदाजाने या सामन्यात हॅट्ट्रिकही घेतली. त्याने ३६ व्या षटकात मोहित भगतानी, अनस आणि सचिन शर्मा यांना लागोपाठ तीन चेंडूत बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. यासह त्याने या मोसमात २२ विकेट पूर्ण केल्या आहेत.
यावेळी, भारताच्या देशांतर्गत टूर्नामेंटमध्ये गोलंदाजाने एका डावात सर्व १० विकेट घेण्याची ही दुसरी वेळ आहे. सुमनच्या आधी हरियाणाच्या अंशुल कंबोजने रणजी ट्रॉफीमध्ये केरळविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
या सामन्यात बिहारने पहिल्या डावात ४६७ धावा केल्या होत्या. यामध्ये दीपेश गुप्ताच्या नाबाद १८३ आणि पृथ्वी राजच्या १२८ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. याला प्रत्युत्तर देताना राजस्थानचा संघ १८२ धावांवर ऑलआऊट झाला. सुमनने एकट्याने राजस्थानला गारद केले.
यानंतर राजस्थानला फॉलोऑन मिळाल्याने तिसऱ्या दिवसअखेर दोन विकेट गमावून १७३ धावा केल्या.
बिहार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश तिवारी यांनी सुमनचे कौतुक करत त्याचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, की सुमन कुमारचे ऐतिहासिक यश बिहार क्रिकेटसाठी एक मोठा क्षण आहे. बिहारमध्ये प्रतिभेची कमतरता नाही आणि बिहारच्या परिसंस्थेत प्रतिभा फुलत असल्याचे त्यांच्या प्रतिभेवरून दिसून येते. बिहार आता राष्ट्रीय स्तरावर चांगले खेळाडू तयार करत आहे.