Bhuvneshwar Kumar : क्रिकेट खेळण्यासाठी बूट नसलेल्या या गोलंदाजानं सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद करून केला होता विक्रम
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Bhuvneshwar Kumar : क्रिकेट खेळण्यासाठी बूट नसलेल्या या गोलंदाजानं सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद करून केला होता विक्रम

Bhuvneshwar Kumar : क्रिकेट खेळण्यासाठी बूट नसलेल्या या गोलंदाजानं सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद करून केला होता विक्रम

Feb 05, 2025 11:05 AM IST

Bhuvneshwar Kumar : भारतीय संघाचा गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज ३५वा वाढदिवस साजरा करत आहे. जाणून घेऊया त्याचा संघर्ष आणि विक्रमांबद्दल…

मॅच खेळण्यासाठी बूट नसलेल्या या गोलंदाजानं सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद करून केला होता विक्रम
मॅच खेळण्यासाठी बूट नसलेल्या या गोलंदाजानं सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद करून केला होता विक्रम

Bhuvneshwar Kumar 35th Birthday : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमार आज त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. नव्या आणि जुन्या दोन्ही चेंडूला इनस्विंग आणि आऊटस्विंग करण्याची क्षमता असलेल्या या गोलंदाजाकडं एकेकाळी खेळण्यासाठी शूज नव्हते. पण त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. जाणून घेऊया भुवनेश्वर कुमार अर्थात भुवीच्या प्रवासाबद्दल…

भुवनेश्वर कुमार हा सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. २०२२ साली तो टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. पण त्यानं आपल्या कारकिर्दीत स्वप्नवत असे अनेक विक्रम रचले आहेत.

भुवनेश्वर कुमारचा जन्म ५ फेब्रुवारी १९९० रोजी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये झाला. लहानपणापासूनच क्रिकेटची आवड असलेल्या भुवीला त्याचं स्वप्न पूर्ण करण्यात त्याची मोठी बहीण रेखाचा वाटा आहे. वयाच्या १३ व्या वर्षी त्यानं पहिल्यांदा क्रिकेट कोचिंग सुरू केलं. अनेक अडचणींनंतर भुवनेश्वर इथपर्यंत पोहोचला आहे. एकेकाळी १७ वर्षांखालील स्पर्धेत खेळण्यासाठी त्याच्याकडं स्पोर्ट्स शूजही नव्हते. पण त्याची बहीण रेखानं खूप मदत केली. रेखानं तिच्या बचतीतून भुवीसाठी शूज घेतले. त्यानंतर भुवी वयाच्या १९व्या वर्षी पहिल्यांदा क्रिकेट जगतात चर्चेचा विषय बनला.

सचिनला शून्यावर बाद करण्याचा विक्रम

भुवनेश्वर कुमार देशांतर्गत क्रिकेटमध्ये यूपीकडून खेळतो. बंगालविरुद्ध खेळताना भुवनेश्वरनं वयाच्या १७ व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्याचवेळी भुवनेश्वरची २००८-०९ च्या रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये बरीच चर्चा झाली. मुंबईविरुद्धच्या या सामन्यात त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला वैयक्तिक शून्य धावांवर बाद केलं होतं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सचिनला शून्यावर बाद करणारा भुवनेश्वर कुमार पहिला गोलंदाज ठरला. त्यानंतरही चार वर्षांनी त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली.

अशी कामगिरी करणारा एकमेव गोलंदाज

भुवनेश्वरनं २५ डिसेंबर २०१२ रोजी पाकिस्तानविरुद्ध टी-२० सामना खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर ३० डिसेंबर २०१२ रोजी त्याला वनडेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली, यावेळीही पाकिस्तानचा संघ त्याच्यासमोर होता. यानंतर २२ फेब्रुवारी २०१३ रोजी त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. आश्चर्याची बाब म्हणजे भुवनेश्वरनं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करताना पहिली विकेट घेतली हाही एक विश्वविक्रम आहे. अशी कामगिरी करणारा भुवी हा जगातील एकमेव गोलंदाज आहे.

किती घेतले बळी?

भुवनेश्वर कुमारनं टीम इंडियासाठी आतापर्यंत २१ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ८७ टी-२० सामने खेळले आहेत. भुवनेश्वरनं कसोटी क्रिकेटमध्ये ६३, एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४१ विकेट आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९० विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं तिन्ही फॉरमॅटमध्ये ५ बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे. फार कमी खेळाडूंना ही कामगिरी करता आली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या