Sunil Gavaskar News: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीची मैदानावरील आक्रमकता अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. कर्णधारपदाच्या काळात विराट ज्या प्रकारे आपल्या आक्रमकतेने मैदानावर विरोधी संघावर वर्चस्व गाजवत असे, त्याबद्दलही त्याचे कौतुक झाले आहे. इतकेच नाहीतर विराटने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि प्रेक्षकांशी त्यांच्याच भाषेत बोलायला सुरुवात केली आणि त्यावरून अनेक वादही झाले. मात्र, भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या अशा कृत्यांवर संताप व्यक्त केला आहे.
सुनील गावसकर यांनी विराटच्या मैदानावरील आक्रमकतेबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराटने २३.७५ च्या सरासरीने एकूण १९० धावा केल्या आहेत. मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थ येथे खेळला गेला, जिथे विराट कोहलीने दुसऱ्या डावात नाबाद शतक झळकावले. परंतु, त्यानंतर संपूर्ण मालिकेत त्याची बॅट शांत राहिली. संपूर्ण मालिकेदरम्यान विराट कोहली एकाच पद्धतीने बाद झाला. त्यासाठी तो टीकाकारांच्या निशाण्यावरही आहे.
सॅम कोन्स्टासने ऑस्ट्रेलियाकडून मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पदार्पण केले. मेलबर्नमध्येही १९ वर्षीय कोन्स्टास आणि विराट यांच्यात वाद झाला होता. विराटने कॉन्स्टासला धक्का मारला होता, त्यानंतर त्याला आयसीसीने दंडही ठोठावला होता. सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील आपल्या कॉलममध्ये गावसकर लिहितात की, ‘विराट कोहलीने कॉन्स्टासला धक्का दिला. हे अजिबात क्रिकेट नाही. जेव्हा भारतीयांना चिथावणी दिली जाते, तेव्हा तो प्रत्युत्तर देण्यास अजिबात मागेपुढे पाहत नाही, पण इथे असे काहीही झाले नाही, विराटला कोणीही डवचले नव्हते.’
गावस्कर पुढे म्हणाले की, ‘खेळाडू अनुभवाने एक गोष्ट शिकतात की प्रेक्षकांवर, जे स्टेडियममध्ये क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आले आहेत, त्यांनी एखाद्या खेळाडूवर हुटिंग केली तर त्यांच्यावर रागावणे ही चांगली गोष्ट नाही, त्यांचे त्या खेळाडूशी वैयक्तिक वैर नसते, ते फक्त स्वतःच्या करमणुकीसाठी हे करतात. अशा गोष्टींवर खेळाडूंनी प्रतिक्रिया न देणे योग्य आहे. यामुळे खेळाडूंचे नुकसान होते.’
‘कोहलीने हे समजून घेतले पाहिजे की, जेव्हा तो अशा परिस्थितीत प्रेक्षकांचा सामना करतो, तेव्हा उर्वरित खेळाडूंना त्याचा फटका सहन करावा लागतो, कारण त्यांच्यावरील दबाव वाढतो. यानंतर उर्वरित खेळाडूही स्टेडियमवर आलेल्या लोकांच्या निशाण्यावर येतात’, असेही सुनील गावस्कर म्हणाले. भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या २२ जानेवारी २०२५ पासून पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे.
संबंधित बातम्या