बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४ सुरू होण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे खेळला जाणार आहे.या पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया जोरदार तयारी करत आहे.
कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात संघाला खेळणार नाही. अशा परिस्थितीत फलंदाजीची संपूर्ण जबाबदारी विराट कोहली याच्या खांद्यावर असेल. रोहितच्या अनुपस्थितीत चाहत्यांना पहिल्या कसोटीत विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
पर्थ कसोटीदरम्यान विराट कोहलीला मोठा विक्रम करण्याची संधीही असेल. खरंतर, विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांमध्ये उत्कृष्ट रेकॉर्ड आहे.
कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २४ कसोटी सामन्यांच्या ४४ डावांमध्ये ४७.४८ च्या सरासरीने २०४२ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ८ शतके आणि ५ अर्धशतके केली आहेत. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारताचा ५वा खेळाडू आहे.
पर्थमधील पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने दोन्ही डावात एकूण १०२ धावा केल्या तर तो दोन दिग्गज भारतीय फलंदाजांचे विक्रम मोडेल. पहिल्या कसोटी सामन्यात ३३ धावा करून कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चेतेश्वर पुजाराला मागे टाकेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पुजाराच्या नावावर २०७४ धावा आहेत. एवढेच नाही तर पुजारानंतर कोहलीला दिग्गज राहुल द्रविड यालाही मागे टाकण्याची मोठी संधी असेल. कोहली द्रविडच्या धावसंख्येपासून फक्त १०१ धावा दूर आहे. द्रविडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५४ कसोटी डावात २१४३ धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने ७४ कसोटी डावांमध्ये ३६३० धावा केल्या आहेत. ज्यात ११ शतके आणि १६ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, सचिनचा हा विक्रम गाठण्यासाठी कोहलीला अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
सचिन तेंडुलकर- ३६३० धावा (७४ डाव)
व्हीव्हीएस लक्ष्मण- २४३४ धावा (५४ डाव)
राहुल द्रविड- २१४३ धावा (५४ डाव)
चेतेश्वर पुजारा- २०७४ धावा (४५ डाव)
विराट कोहली- २०४२ धावा (४४ डाव)