भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफीला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पहिला कसोटी सामना पर्थ येथे होणार आहे. अशातच आता मंगळवारी (१९ नोव्हेंबर) सकाळी पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवरील पीचची पहिली झलक समोर आली. २२ यार्डांची ही खेळपट्टी पाहून फलंदाजांना अजिबात आनंद होणार नाही. विशेषतः भारतीय फलंदाजांना.
पर्थच्या खेळपट्टीला अजूनही पाणी दिले जात आहे, त्यामुळे पीचवर हिरवा रंग दिसतो आहे. यामागील एक कारण म्हणजे पृष्ठभाग लवकर कोरडे होत नाही. अशा स्थितीत खेळपट्टीकडून सीम मूव्हमेंट, पेस आणि बाउन्सची अपेक्षा केली जाऊ शकते.
पर्थ येथील पीच नेहमीच फलंदाजांसाठी धोकादायक म्हणून ओळखली जाते. आणि विशेष म्हणजे, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ८० वर्षांच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पर्थ येथून कसोटी मालिकेची सुरुवात होत आहे.
गेल्यावेळी दोन्ही संघात पर्थ येथे एकही कसोटी सामन झाला नव्हता. ऑप्टस हे नवीन स्टेडियम आहे. तर पर्थचे WACA स्टेडियम ऐतिहासिक आहे.
गेल्या वेळी म्हणजेच, तीन वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिकेत पराभव केला. या पराभवानंतर आता ऑस्ट्रेलियाने आपल्या नियोजनात मोठा बदल केला आहे. कांगारूंनी त्यांच्या ड्रॉप-इन खेळपट्ट्यांवर भरपूर गवत सोडण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे या पीच वेगवान गोलंदाजीसाठी स्वर्ग बनल्या आहेत.
फलंदाजांसाठी ही चिंतेची बाब आहे, पण पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराहसह दोन्ही संघांच्या गोलंदाजांसाठी ही चांगली बातमी आहे.
पहिला सामना, २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ.
दुसरा सामना, ६ ते १० डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट).
तिसरा सामना, १४ ते १८ डिसेंबर, गाबा.
चौथा सामना, २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न.
पाचवा सामना, ३ ते ७ जानेवारी, सिडनी.