India Vs England 5th Test Dharamsala : भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून (७ मार्च) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.
भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला. आता भारताची फलंदाजी सुरू आहे.
भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल यांनी शतकं ठोकली. या शतकांच्या बळावर भारताने इंग्लंडवर मोठी आघाडी घेतली आहे.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने (Ben Stokes) अद्याप गोलंदाजी केली नव्हती. स्टोक्सवर सर्जरी झाली आहे, यानंतर त्याला काही काळ गोलंदाजी न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पण या कसोटी सामन्यात रोहित आणि शुभमन गिलने इंग्लिश गोलंदाजांना चांगलेच थकवले. दोघांनी ४० षटकं फलंदाजी केली आणि १७१ धावांची भागिदारी केली. अशा परिस्थितीत इंग्लंडच्या गोलंदाजांना विकेट मिळत नव्हती.
यामुळे लंचनंतर पुन्हा खेळ सुरू होताच स्टोक्सने चेंडू स्वताकडे घेतला. प्रदीर्घ काळानंतर टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर बेन स्टोक्सने भारतीय कर्णधार रोहित शर्माचा त्रिफळा उडवला आणि त्याची शतकी खेळी संपवली.
बेन स्टोक्सने याआधी २०२३ च्या जून महिन्यात गोलंदाजी केली होती. यानंतर त्याने आज गोलंदाजी केली. त्यावेळी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ बळी घेतले होते. यानंतर स्टोक्सने स्वत:ला गोलंदाजीपासून दूर ठेवले. पण आज जेव्हा भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी उपाहारापर्यंत शतके पूर्ण केली आणि इंग्लंडला विकेट मिळत नव्हत्या, तेव्हा बेन स्टोक्सने स्वतः गोलंदाजीची जबाबदारी घेतली.
बेन स्टोक्स प्रदीर्घ काळानंतर कशी गोलंदाजी करतो याकडे साऱ्या जगाच्या नजरा लागल्या होत्या. स्टोक्स जवळपास ९ महिन्यानंतर गोलंदाजी करत होता. स्टोक्सचा गुड लेन्थ बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि रोहितचा त्रिफळा उडाला. हा एक जादूई चेंडू होता, जो पाहून सगळेच थक्क झाले. आऊट होण्यापूर्वी रोहित शर्माने १६२ चेंडूत १०३ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, ज्यामध्ये त्याने १३ चौकार आणि ३ षटकार मारले.
बेन स्टोक्सने १०१ कसोटी सामन्यात १९८ विकेट घेतल्या आहेत. स्टोक्सने ११४ वनडे खेळताना ७४ विकेट घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याने ४३ सामन्यात २६ विकेट घेतल्या आहेत.
जगातील महान अष्टपैलू खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. बेन स्टोक्सने रोहित शर्माला बाद करताच काही वेळातच जेम्स अँडरसनने शुभमन गिलला बाद करून भारताला दिवसाचा दुसरा धक्का दिला.
आज पहिल्या सत्रात भारताची एकही विकेट पडली नाही. शुभमन गिल आणि रोहित शर्माने आपली शतके पूर्ण केली. रोहित आणि शुभमन गिल बाद झाल्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणारा देवदत्त पडिक्कल आणि करिअरचा तिसरा सामना खेळत असलेला सरफराज खाननेही अर्धशतके केली. भारतीय संघ मोठी आघाडीकडे वाटचाल करत आहे.
संबंधित बातम्या