India vs England 2nd Test Day 4, Vizag : भारत आणि इंग्लंड यांच्यात विशाखापट्टणम येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.आज (५ फेब्रुवारी) सामन्याचा चौथा दिवस आहे. इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धांवाचे लक्ष्य आहे.
या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड सध्या बिकट स्थितीत आहे. इंग्लंडने सुरुवात चांगली केली होती. पण त्यानंतर आज चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात त्यांनी ५ विकेट लवकर गमावल्या. त्यामुळे ते दबावात आले.
पण यानंतर इंग्लिश कर्णधार आणि सर्वात मोठा चेस मास्टर बेन स्टोक्स क्रीजवर उभा होता. भारताला हा सामना जिंकायचा असेल, तर बेन स्टोक्सला कोणत्याही परिस्थितीत बाद करणे आवश्यक होते. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माने एकामागून एक सर्व गोलंदाज वापरण्यास सुरुवात केली.
कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विन या सर्व गोलंदाजांनी एकामागून एक आक्रमण केले. बॅझबॉलचा पराभव करण्यासाठी रोहितने फील्ड सेटिंग वारंवार बदलली. पण असे असूनही भारताला १० षटकांत एकही विकेट मिळाली नाही. तर इंग्लंडला विजयासाठी १७९ धावा करायच्या होत्या. स्टोक्स आणि बेन फॉक्स यांच्यातील भागीदारी फुलू लागली होती, तेव्हा श्रेयस अय्यरच्या एका जादुई थ्रोने बेन स्टोक्सला धावबाद केले.
स्टोक्स धावबाद झाल्यानंतर भारताच्या खेळाडूंनी प्रचंड जल्लोष केला. तर श्रेयस अय्यरनेही खास अंदाजात बेन स्टोक्सला निरोप दिला. विशेष म्हणजे, भारताच्या डावात श्रेयस अय्यरचा अवघड झेल बेन स्टोक्सनेच घेतला होता.
तत्पूर्वी, या कसोटी सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदजी केली आणि सर्वबाद ३९६ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २५३ धावात गारद झाला आणि भारताला १५३ धावांची आघाडी मिळाली. यानंतर भारताचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला आणि पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंडला ३९९ धावांचे लक्ष्य मिळाले.
संबंधित बातम्या