आयपीएल २०२५ साठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे खेळाडूंचे मेगा ऑक्शन पार पडले. पण या लिलावात इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स दिसला नाही. कारण स्टोक्सने या लिलावातून आपले नाव मागे घेतले होते. लिलावानंतर स्टोक्सने आयपीएल ऑक्शनमध्ये सहभाग का घेतला नाही, याचे कारण सांगितले आहे.
आयपीएलच्या नवीन नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर ३३ वर्षीय स्टोक्सने लिलावात आपले नाव नोंदवले तर त्याला पुढील दोन वर्षे आयपीएल ॲक्शनमध्ये राहवे लागणार होते. तथापि, इंग्लिश अष्टपैलू खेळाडूने सांगितले की, त्याला आयपीएलमध्ये न खेळण्याची चिंता नाही कारण इंग्लंडसाठी जास्तीत जास्त खेळणे हे त्याचे ध्येय आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी स्टोक्स म्हणाला की, तो त्याच्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे आणि त्याला इंग्लंडची जर्सी जास्तीत जास्तवेळा परिधान करायची आहे. या कारणामुळे त्याने आयपीएल मेगा लिलावातून आपले नाव मागे घेतले.
स्टोक्सने बीबीसी टेस्ट मॅच स्पेशलशी केलेल्या संभाषणात सांगितले की, “आता बरेच क्रिकेट होत आहे. मी माझ्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे, यात लपवण्यासारखे नाही. मला निश्चितच दीर्घकाळ खेळायचे आहे. मला माझ्या शरीराकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे लागेल. मी कधी आणि कुठे खेळावे, याला प्राधान्य द्यायला हवे.
तो पुढे म्हणाला, “मी या वर्षी SA20 मध्ये MI केपटाऊनसाठी खेळलो. त्यामुळे मला पुढे काय होणार आहे याकडे लक्ष देणे आणि माझ्या शरीराचा विचार करून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. मला माझी कारकीर्द लांबवायची आहे. मला दीर्घकाळ इंग्लंडची जर्सी घालायची आहे.
बेन स्टोक्सनेही न्यूझीलंडने भारतात ३-० ने जिंकलेल्या कसोटी संघाचे कौतुक केले. स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडला भारतात १-४ असा पराभव स्वीकारावा लागला होता. भारतात मालिका जिंकणे किती कठीण असते हे इंग्लिश कर्णधाराला माहीत आहे. न्यूझीलंडच्या विजयाबाबत तो म्हणाला की ही क्रिकेट जगतासाठी आनंदाची बातमी आहे कारण किवी संघाने जे केले ते फार काळापासून कोणताही संघ करू शकला नाही'.