IPL 2025: बेन स्टोक्स आयपीएलच्या पुढील दोन हंगामासाठी अपात्र, बीसीसीआयची कारवाई, कारण काय?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025: बेन स्टोक्स आयपीएलच्या पुढील दोन हंगामासाठी अपात्र, बीसीसीआयची कारवाई, कारण काय?

IPL 2025: बेन स्टोक्स आयपीएलच्या पुढील दोन हंगामासाठी अपात्र, बीसीसीआयची कारवाई, कारण काय?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 07, 2024 10:31 AM IST

Ben Stokes banned From IPL: आयपीएल २०२५ साठी येत्या २४-२५ नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे मेगा लिलाव होणार आहे. याआधी स्टार ऑलराऊंड बेन स्टोक्स आणि त्याच्या चाहत्यांना धक्का देणारी माहिती समोर आली.

बेन स्टोक्स आयपीएलच्या पुढील दोन हंगामासाठी अपात्र
बेन स्टोक्स आयपीएलच्या पुढील दोन हंगामासाठी अपात्र (X)

Ben Stokes News: आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाची तारीख निश्चित झाली आहे. आयपीएल 2025 चा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दा येथे होणार आहे.  भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने मेगा लिलावाच्या तारखेसह नोंदणी करणाऱ्या खेळाडूंची जागा आणि यादी जाहीर केली आहे. यावेळी लिलावासाठी १ हजार ५७४ खेळाडूंनी नोंदणी केली आहे. मात्र, इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्सचे नाव या यादीत नाही.  बेन स्टोक्सला आयपीएलच्या पुढील दोन हंगामासाठी अपात्र ठरण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने बीसीसीआयने ही कारवाई केली आहे.

मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने आयपीएलची काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. आयपीएलच्या मेगा लिलावात परदेशी खेळाडूने नाव नोंदणी न केल्यास तो पुढील वर्षीच्या लिलावात सहभागी होण्यास अपात्र ठरेल, असा एक नियम होता. त्यामुळे बेन स्टोक्स २०२६ च्या लिलावात सहभागी होऊ शकणार नाही. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, 'कोणत्याही परदेशी खेळाडूला मेगा लिलावासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. परदेशी खेळाडूने नोंदणी न केल्यास तो पुढील वर्षीच्या लिलावासाठी अपात्र ठरेल.'

बीसीसीआयने हा नियम तयार केला कारण गेल्या काही वर्षांत मेगा लिलावात सहभागी न झाल्याने परदेशी खेळाडू छोट्या लिलावात मोठी कमाई करत असल्याचे दिसून आले होते. यामुळे खेळाडूंनी लिलावात नोंदणी करणे, बंधनकारक आहे.  २०२२ च्या मेगा लिलावात अनुपस्थित राहिल्यानंतर तो २०२३ च्या लिलावात आला होता, ज्यात चेन्नई सुपर किंग्जने १६.२५ कोटी रुपये खर्च करून त्याला आपल्या संघात समाविष्ट केले होते.

मेगा लिलावात आपले नाव न दिल्यामुळे बेन स्टोक्स आयपीएलच्या २०२५ आणि २०२६ आवृत्तीचा भाग बनू शकणार नाही. २०२७ च्या लिलावात एखाद्या संघाने बेन स्टोक्सला खरेदी केले तरच त्याला आयपीएल २०२७ मध्ये खेळणे शक्य होईल. स्टोक्सच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत ४३ सामन्यात ९२० धावा केल्या आणि २८ विकेट्सही घेतल्या आहेत.

Whats_app_banner
विभाग