test cricket incentive scheme : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंचा एक डाव आणि ६४ धावांनी पराभव केला. या सोबत भारताने ही मालिका ४-१ अशी आपल्या नावावर केली आहे.
भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआय आता 'कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना' (test cricket incentive scheme) सुरू करणार आहे, या अंतर्गत कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना भरपूर लाभ मिळणार आहेत.
ट्विटरवर या नवीन योजनेची घोषणा करताना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले की, "मला हे कळवण्यास अतिशय आनंद होत आहे की पुरुष क्रिकेट संघासाठी 'कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना' सुरू करण्यात येत आहे. यामुळे आमच्या खेळाडूंना अधिक आर्थिक संधी उपलब्ध होतील. त्यांना मदत मिळेल. आणि त्यांच्या कारकिर्दीला स्थैर्य मिळेल.
'कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना' २०२२-२०२३ हंगामापासून वैध असेल. या योजनेंतर्गत, प्रत्येक सामन्यासाठी १५ लाख रुपये फी व्यतिरिक्त, कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना आणखी एक बक्षीस देखील दिले जाईल."
सध्याच्या स्थितीत कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना एका सामन्यासाठी १५ लाख रुपये मानधन मिळते. पण आता या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेत एक महत्त्वाची बाबही जोडण्यात आली आहे. जर एखाद्या खेळाडूने संपूर्ण हंगामात ७५ टक्के किंवा त्याहून अधिक सामने खेळले तर त्या खेळाडूला प्रत्येक सामन्यासाठी प्रोत्साहन म्हणून ४५ लाख रुपये अधिक मिळतील. दुसरीकडे, प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असलेल्या खेळाडूंना २२.५ लाख रुपये दिले जातील.