2024 Womens T20 World Cup: आगामी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा यावेळी बांगलादेशमध्ये खेळवली जाणार आहे. परंतु, बांगलादेशमधील हिंसाचार पाहता बांगलादेश टी-२० विश्वचषकाचे यजमानपद गमावण्याची शक्यता वाढली आहे. आयसीसी बांगलादेशमधील परिस्थितीवरही लक्ष ठेवून आहे. याचपार्श्वभूमीवर आगामी महिला टी-२० विश्वचषक भारत, श्रीलंका किंवा यूएईमध्ये आयोजित केला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली. मात्र, बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यास नकार दिला. त्यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे.
ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषकाला जास्त वेळ उरलेला नाही. पण त्याआधी बांगलादेशमध्ये हिंसाचार उफळला आहे. अशा परिस्थितीत ही स्पर्धा बांगलादेशात आयोजित होण्याबाबत साशंकता आहे. जय शाह यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने महिला टी२० विश्वचषक भारतात आयोजित करण्यास नकार दिला आहे.
बांगलादेशातील बिघडलेली परिस्थिती पाहता पर्याय म्हणून टी-२० विश्वचषकाचे यजमानपद भारताला देण्याचे आयसीसी विचार करत होती. मात्र, जय शाह यांनी बीसीसीआयची भूमिका स्पष्ट केली. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना जय शाह म्हणाले की, 'भारतात सध्या पाऊस सुरू आहे. याशिवाय, भारतात पुढच्या वर्षी महिला एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन केले जाणार आहे. यामुळे सलग दोन वर्ष विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्याबाबत बीसीसीआय कुठलाही विचार करत नाही.'
बांगलादेशचा संघ पुढच्या महिन्यात भारत दौरा करणार आहे, जिथे दोन्ही संघात दोन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. तर, या मालिकेतील शेवटचा सामना २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान खेळला जाईल. यानंतर काही दिवसांनी म्हणजेच ६ ऑक्टोबरपासून टी-२० मालिका खेळली जाईल. टी-२० मालिकेतील शेवटचा सामना १२ ऑक्टोबर २०२४ रोजी खेळला जाणार आहे.
पहिला कसोटी सामना: १९ सप्टेंबर- २३ सप्टेंबर
दुसरा कसोटी सामना: २७ सप्टेंबर- ०१ ऑक्टोबर
पहिला टी-२० सामना: ०६ ऑक्टोबर २०२४
दुसरा टी-२० सामना: ०९ ऑक्टोबर २०२४
तिसरा टी-२० सामना: १२ ऑक्टोबर २०२४