IND vs AUS: विश्वचषकापूर्वी भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिका रंगणार; लवकरच संघाची घोषणा
IND vs AUS ODI Series: ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआय लवकरच भारतीय संघाची घोषणा करणार आहे.
India vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या २२ सप्टेंबर २०२३ एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. यासाठी बीसीसीआय आज १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. या यादीत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांसारख्या खेळाडूंचा समावेश असू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेनंतर लगेच ५ ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषकाला सरुवात होणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेसाठी आज ८.३० वाजता संघाची घोषणा केली जाऊ शकते. इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट निवड समिती रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुहराह आणि हार्दिक पांड्याला विश्रांती देऊ शकते. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेनंतर एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. अशा स्थितीत प्रमुख खेळाडूवरील कामाचा ताण कमी करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असेल.
विराट कोहली भारताचा महत्त्वाचा खेळाडू आहे. पंरतु, तो गेल्या काही दिवसांपासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. यामुळे विश्वचषकापूर्वी त्याला विश्रांती देण्याची गरज आहे. विराटसह रोहित शर्मालाही ब्रेक देण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, दिर्घकाळानंतर भारतीय संघात परतलेल्या जसप्रीत बुमराह भारताचा आघाडीचा गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत त्याला विश्रांती दिली जाऊ शकते.
रोहित शर्माच्या अनुपस्थित ईशान किशन आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतात. मधल्या फळीत केएल राहुलला संघात जागा मिळण्याची शक्यता आहे. दुखापतीवर मात केल्यानंतर केएल राहुलने आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध तुफानी शतकी खेळी केली होती. सध्या तरी श्रेयस अय्यरच्या फिटनेसबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तो तंदुरुस्त राहिल्यास त्याला संघात स्थान मिळू शकते.
विभाग